भाजप जगातील सर्वांत महत्त्वाचा पक्ष !

वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेखात दावा !

‘भारताच्या साहाय्याविना चीनची वाढती शक्ती रोखण्याचे अमेरिकी प्रयत्न अयशस्वी होतील’, असाही दावा !

नवी देहली – भारताचा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष अमेरिकेच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वांत महत्त्वाचा विदेशी राजकीय पक्ष आहे. त्याला कमी लेखता येणार नाही. वर्ष २०१४ आणि २०१९ मधील विजयानंतर भाजप वर्ष २०२४ मध्ये निवडणुकीत पुन्हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मत वॉल्टर रसेल मीड यांच्या अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मांडले आहे. ‘भारताच्या साहाय्याविना चीनची वाढती शक्ती रोखण्याचे अमेरिकी प्रयत्न अयशस्वी होतील’, असा दावाही त्यांनी यात केला आहे.

लेखक मीड यांनी म्हटले की,

. भाजपच्या निवडणूक रणनीतीमध्ये हिंदु धोरण स्पष्टपणे दिसत आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे भाजपला एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे नेतृत्व करून जागतिक महासत्ता बनण्याची आशा आहे.

२. अनेक लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शक्तीची भीती वाटते, ज्याचा भाजप नेतृत्वाशी जवळचा संबंध आहे. तथापि भारताच्या ईशान्येकडील ख्रिस्तीबहुल राज्यांमध्ये भाजपला अलीकडील काही वर्षांत उल्लेखनीय राजकीय यश मिळाले आहे. जातीय भेदभावाविरुद्ध लढण्याच्या प्रयत्नांमध्ये संघ कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

३. जवळपास २० कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशातील भाजप सरकारला शिया मुसलमानांचा भक्कम पाठिंबा आहे.