सीबीडी, सानपाडा, आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रा !

नवी मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, सानपाडा आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडी येथे ‘सकल हिंदु समाज’ यांच्या वतीने कालीमाता मंदिर ते अलबेला हनुमान मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सानपाडा येथे ‘अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने, तर वाशी येथे ‘हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती’च्या वतीने शोभायात्रा काढण्यात येईल. सानपाडा येथील स्वागतयात्रेचा प्रारंभ हुतात्मा बाबू गेनू मैदान ते मिलेनियम टॉवर, सेक्टर-१०, ४, ३ हून होऊन शेवट पुन्हा हुतात्मा बाबू गेनू मैदानात होणार आहे. या मिरवणुकीत ढोल-ताशा, लेझीम पथक, मंगळागौरी पथक, वेशभूषा आदींचा सहभाग असणार आहे.

वाशी येथील मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा, लेझीम, ब्रास बँड पथक, श्रीमंत गावदेवी मरीआई मंदिर ट्रस्टचे मंगळागौरी पथक, दशावतार, दुचाकीस्वार, यांच्यासमवेत वारकरी संप्रदाय, इस्कॉन, स्वामी नारायण संस्था, बालाजी मंदिर यांची भजनी मंडळे, तसेच चेंदा मेलन, कथ्थक आदी संस्था आणि संघटना सहभागी होणार आहे. सेक्टर १४ स्वामीनारायण मंदिर येथून ही शोभयात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर ९ वाशी येथे या शोभायात्रेची सांगता होणार आहे.