गोव्यात ‘एच् ३ एन् २’बाधित २ रुग्ण : सामाजिक स्वच्छता सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ

पणजी – देशात, तसेच गोवा राज्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयाने नागरिकांना कोरोना पसरू नये यासाठी सामाजिक अंतर नियमांचे सतर्क राहून पालन करण्यास सांगितले आहे.

राज्यात २० मार्च या दिवशी १७० जणांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली. यांपैकी १७ जण म्हणजे १० टक्के कोरोनाबाधित आढळले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्‍यांची संख्या १०९ झाली आहे. राज्यात ‘एच् ३ एन् २’ या प्रकाराने बाधित २ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोवा राज्यात कोरोना आणि इन्फ्लूएंझा पसरू नये, यासाठी पाळत ठेवणे चालू आहे.

चांगली वैयक्तिक स्वच्छता पाळा, साबणाने वारंवार हात धुण्याची सवय ठेवा, खोकतांना किंवा शिंकतांना तोंड झाकून ठेवा, शक्यतो कोपर्‍यात खोकण्याचा प्रयत्न करा; खोकला, वहाणारे नाक आदी लक्षणे आढळल्यास अन्य लोकांशी किंवा अशी लक्षणे असलेल्या माणसांशी संपर्क टाळा, खोकला किंवा वहाणारे नाक यांसारखी श्वसनाची लक्षणे असल्यास मास्क घाला; गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, शाळेत जाणार्‍या मुलांनी आजारी असतांना घरीच रहावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आजारी व्यक्ती आणि वृद्ध यांनी फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याविना औषध घेऊ नका, अशा सूचना आरोग्य संचालयाने केल्या आहेत.