वेलसाव (गोवा) येथे रेल्वेच्या कामगारांवर दगडफेक

  • जे.सी.बी. यंत्राची हानी
  • १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
जे.सी.बी. यंत्राची हानी

वास्को, २० मार्च (वार्ता.) – वेलसाव येथे दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामासाठी आणलेल्या जे.सी.बी. यंत्राची हानी आणि कामगारांवर दगडफेक करून त्यांना मारहाण केल्याविषयी ४ सामाजिक कार्यकर्ते आणि १० ग्रामस्थ यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. (हिंसक मार्ग अवलंबणार्‍यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणता येईल का ? – संपादक)

यासंबंधी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओलेन्सियो सिमॉईश, ऑर्विल दोरादो, फ्रान्सिस ब्रागांझा आणि कामिलो डिसोझा (पंचसदस्य) आणि इतर १० जणांनी तिथे काम करणारे कनई सरदार आणि रामेश्वर सरदार या कामागारांवर शस्त्रांनी आक्रमण केले, तसेच तिथे असलेल्या रेल्वे विकास निगमच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या जे.सी.बी. यंत्रावर दगडफेक करून हानी केली. यामुळे अंदाजे ४५ सहस्र रुपयांची हानी झाली. मारहाण करणार्‍या ४ कार्यकर्त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७,३२४,४२७ आणि १४९ अन्वये रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांच्या नेतृत्वाखाली वास्को रेल्वे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.