कॉपीचे प्रकार न थांबल्‍यास राज्‍याचे वाटोळे होईल ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

  • टाकळी-मनोरा येथे सामूहिक कॉपीसाठी इयत्ता १० वीचे परीक्षा केंद्र कह्यात घेण्‍याचा प्रकार !

  • परीक्षार्थींना कॉपी पुरवणार्‍या जमावाकडून भरारी पथकावर लाठ्या-काठ्यांद्वारे आक्रमण !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – नगर जिल्‍ह्यातील टाकळी-मनोरा (तालुका पाथर्डी) येथील इयत्ता १० वीच्‍या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना कॉपी पुरवणार्‍या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्‍यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच कह्यात घेण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. ही गोष्‍ट अत्‍यंत गंभीर आहे. गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात असे कॉपीचे आणि पेपरफुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्‍यास राज्‍याचे वाटोळे होईल, असा घणाघात करत ‘सरकारने या विरोधात कडक भूमिका घ्‍यावी’, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १६ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्‍हणाले, जालना येथील परीक्षेच्‍या वेळी जिल्‍हा परिषद शाळा, सेवली या केंद्रावर ‘आमच्‍या पाल्‍यांना कॉपी करू द्या, अन्‍यथा तुम्‍हाला जिवे मारू’, अशा धमक्‍याच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना देण्‍यात आल्‍या आहेत. असे प्रकार घडल्‍यास अभ्‍यास करणार्‍या विद्यार्थ्‍यांवर मोठा अन्‍याय होणार आहे.