हसतमुख, प्रेमळ आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या अमरावती येथील (कै.) सौ. शीला विनायकराव नागपुरे (वय ६३ वर्षे) !

११.२.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता सौ. शीला विनायकराव नागपुरे यांचे अमरावती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या मागील २० वर्षांपासून सेवाकेंद्रातील, तसेच प्रासंगिक सेवा करत होत्या. त्यांचे कुटुंबीय, तसेच साधक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) सौ. शीला नागपुरे

१. श्री. गजानन नागपुरे ((कै.) सौ. शीला नागपुरे यांचा मुलगा), खामगाव, जिल्हा बुलढाणा.

१ अ. गुणवैशिष्ट्ये

१ अ १. प्रेमभाव : ‘आईमध्ये (सौ. शीला नागपुरे यांच्यामध्ये) उच्च प्रतीचा प्रेमभाव होता. ‘प्रत्येकाला जीव लावणे, त्याच्या संकटकाळात त्याला साहाय्य करणे, आस्थेने विचारपूस करणे’, या कृती ती प्रेमभावाच्या अंतर्गत करत असे.

१ अ २. सहनशीलता : मागील १२ वर्षांपासून आजारपणामुळे वडिलांचा स्वभाव चिडचिडा झाला होता. रात्री कितीही वाजता त्यांनी खायला मागितले, तरी ती उठून लगेच त्यांना करून देत असे.

१ अ ३. शिकण्याची वृत्ती

अ. ‘आपल्याला सत्संगात इतरांप्रमाणे विषय मांडता यायला पाहिजे’, असे तिला वाटायचे. त्याप्रमाणे सौ. अनुभूती टवलारे यांच्याकडून संहिता घेऊन आणि पाठांतर करून तिने भजनी मंडळात दत्तजयंतीनिमित्त प्रवचन केले.

आ. सनातनच्या बिंदूदाबनाविषयीच्या ग्रंथाचा सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे कृती करून तिने तिच्या स्तरावर यशस्वीपणे प्रयत्न केले.

१ अ ४. भजने रचणे : आईला लिखाणाची पुष्कळ आवड होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला भावस्थितीत समर्पित होतील, अशा पद्धतीची सुंदर भजने तिने रचली होती.

१ अ ५. भाव : सेवाकेंद्रातील सेवा करतांना ‘स्वयंपाक, संतसेवा आणि स्वच्छतेची सेवा, या सर्व सेवा भावपूर्ण कशा होतील ?’, असे तिचे प्रयत्न असायचे. भजन म्हणतांना तिचा उत्कट भाव दाटून यायचा.

श्री. गजानन नागपुरे

१ आ. शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताच्या अनुसंधानात रहाणे : ११.२.२०२३ या दिवशी तिने गजानन महाराज मंदिर (साईनगर) येथे भागवत पुराण ऐकले. ते ऐकत असतांना त्रास होत असल्याने ती बाहेर आली आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत ती भगवंताच्या अनुसंधानातच होती.

१ इ. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

१ इ १. आईच्या निधनानंतरच्या दहाव्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो असता ‘तीन पिढ्यांतील तीन कावळे त्या ठिकाणी आले होते, तसेच तिची कोणतीही अपूर्ण इच्छा राहिली नाही’, असे पूजनाला आलेल्या महाराजांनी सांगितले.

१ इ २. छायाचित्रात पालट जाणवणे  

अ. पू. पात्रीकरकाका वडिलांना भेटायला घरी आले होते. त्या वेळी तेराव्याच्या पूजनासाठी काढलेले आईचे छायाचित्र त्यांना दाखवले. त्या वेळी ‘छायाचित्रातील गुलाबी रंगाची छटा वाढत आहे आणि ती पुढे वाढत जाणार’, असे त्यांनी सांगितले.

आ. त्या छायाचित्राचे वैशिष्ट्य असे की, कोणत्याही दिशेकडून बघितल्यावर ‘ती आपल्याकडेच बघत आहे’, असे सातत्याने जाणवते.’

२. श्री. आनंद डाऊ, अमरावती सेवाकेंद्र

२ अ. ‘नागपुरेकाकू हसतमुख होत्या.

२ आ. इतरांचा विचार करणे : त्यांना सेवाकेंद्रात स्वयंपाकाच्या सेवेसाठी सोडण्याची आणि परत घरी आणण्याची सेवा माझ्याकडे होती. कधी विलंब होत असेल, तर त्या मला आधीच सूचित करायच्या, म्हणजे त्यांच्या घरी माझा वेळ जाणार नाही.’

३. श्रीमती सुलभा डाऊ (वय ७४ वर्षे), अमरावती सेवाकेंद्र

अ. ‘सेवाकेंद्रात स्वयंपाकाच्या सेवेला बोलावल्यावर त्या लगेच ‘हो’ म्हणायच्या आणि कधी कधी पोळ्या घरून करून द्यायच्या.

आ. एकदा माझा पाय दुखत असतांना त्यांनी तेल लावून माझे पाय चोळून दिले आणि दुसर्‍या दिवशी दुखण्याविषयी प्रेमाने विचारपूस केली.’

४. सौ. अरुणा प्रकाश बिंड, साईनगर, अमरावती.

४ अ. ‘त्या नवीन व्यक्तींची स्वतःहून प्रेमाने बोलून ओळख करून घ्यायच्या.

४ आ. पुढाकार घेणे : एकदा त्यांच्या भागामध्ये मी सत्संग घेतला. तेव्हा त्यांनी स्वतःहून ‘थोडा विषय मी मांडू का ?’, असे विचारून संहिता न वाचता भावपूर्ण विषय मांडला. त्यांना पुढील विषय मांडता येत नव्हता. तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे ‘आता मला सांगता येत नाही’, असे सांगून क्षमा मागितली आणि ‘पुढील विषय सौ. बिंड घेतील’, असे सांगून प्रसंगावधान दाखवले.

४ इ. स्वयंपाकाची सेवा भावपूर्ण करणे : काकू अमरावती सेवाकेंद्रात सेवेला यायच्या. स्वयंपाक करतांना त्या भजन गुणगुणायच्या, तसेच ‘गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यासाठी नैवेद्य बनवत आहे’, असा त्यांचा भाव असायचा. पू. पात्रीकरकाकांसाठी त्या खाऊ बनवून आणायच्या.

४ ई. भजन म्हणतांना देहभान विसरून जाणे : त्यांचे भजनी मंडळ होते. त्या स्वतः भजनाच्या चाली तयार करून गायच्या आणि गातांना त्या इतक्या रंगून जायच्या की, देहभान विसरून नाचायच्या. हे दृश्य मी अनेकदा बघितले आहे. त्या वेळी त्यांची भावजागृती व्हायची. ज्या देवतेचे भजन म्हणायच्या, त्यात त्या तल्लीन होऊन जायच्या.

४ उ. ‘घरचे सर्व कुटुंबीय आनंदी कसे रहातील ?’, असा त्यांचा सतत प्रयत्न असायचा. त्या कुटुंबियांशी सकारात्मकतेने आणि निरपेक्ष भावाने वागण्याचा प्रयत्न करायच्या.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.२.२०२३)