भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्‍या महिलेला खडसावले !

भाजपचे खासदार एम्. मुनीस्वामी महिलेला खडसावतांना

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या कोलार मतदारसंघातील भाजपचे खासदार एम्. मुनीस्वामी यांनी चन्नइहा मंदिराच्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर एका विक्री केंद्रावरील कपड्यांची विक्री करणार्‍या महिलेला तिने पती जिवंत असतांना टिकली न लावल्याने खडसावले.

प्रथम कपाळावर टिकली लाव. तुझा नवरा जिवंत आहे ना ?

मुनीस्वामी या महिलेला म्हणाले, ‘‘प्रथम कपाळावर टिकली लाव. तुझा नवरा जिवंत आहे ना ? तुला ‘कॉमन सेन्स’ (सामान्य ज्ञान) नाही का ?’’ असे सांगून मुनीस्वामी यांनी या महिलेला टिकली देण्यास त्यांच्या सहकार्‍यांना सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर वाद निर्माण झाला. काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. ‘अशा घटनांवरून भाजपची संस्कृती दिसून येते’, अशी टीकाही काँग्रेसने केली. (काँग्रेसच्या या टीकेतून त्यांची विकृती दिसून येते, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे नाही ! – संपादक) 

काँग्रेसने या घटनेचा केला निषेध !

(सौजन्य : India Today) 

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मानुसार सौभाग्यवती महिलेने कपाळावर कुंकू लावणे अपेक्षित आहे. त्यातून महिलेला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हिंदु महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांच्याकडून याचे पालन होत नाही !
  • कुंकू किंवा टिकली न लावणार्‍या विवाहित महिलेला कुणी ते लावण्यास सांगत असेल, तर ते चुकीचे कसे ? हिंदूंना धर्मपालन करण्यास कुणी सांगत असतांना त्याला काँग्रेस आणि अन्य ढोंगी पुरो(अधो)गामी विरोध करतात; मात्र हेच लोक कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्याला विरोध करतात ! यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो !