उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

दापोलीतील वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी चौकशी

उद्योजक सदानंद कदम

रत्नागिरी – शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ, तसेच माजी पालकमंत्री अधिवक्ता अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले उद्योजक सदानंद कदम यांना खेड तालुक्यातील कुडोशी येथील त्यांच्या ‘फार्महाऊस’वरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पथकाने १० मार्चच्या पहाटे कह्यात घेतले. ५ मार्चला खेड येथे झालेली उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी सदानंद कदम यांचा सक्रीय सहभाग होता.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात सदानंद कदम आणि  अधिवक्ता अनिल परब यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपावरून सदानंद कदम यांची चौकशी चालू होती.

माजी आमदार संजय कदम यांची शिंदे गट आणि भाजप यांच्यावर टीका

‘साई रिसॉर्ट’वर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे, अशी टीका ठाकरे गटात नुकताच प्रवेश केलेले  माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे गट आणि भाजप यांच्यावर केली.

काय आहे ‘साई रिसॉर्ट’ प्रकरण ?

दापोली तालुक्यातील मुरुड येथील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी अधिवक्ता अनिल परब यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. अनिल परब यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे हे रिसॉर्ट बांधल्याचा, पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवल्याचा, तसेच महसूल बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, वर्ष २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला होता. कोरोना महामारीच्या दळणवळणबंदीच्या कालावधीत त्यांनी या भूखंडावर रिसॉर्ट बांधले. ही भूमी खरेदी केल्यानंतर २ वर्षांनी, म्हणजे वर्ष २०१९ मध्ये तिची नोंदणी झाली आणि वर्ष २०२० मध्ये ही भूमी मुंबईतील ‘केबल ऑपरेटर’ आणि सदानंद कदम यांना १ कोटी १० लाख रुपयांना विकण्यात आली. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने वर्ष २०२२ मध्ये अनिल परब यांच्या मालमत्तेच्या ७ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. परब यांनी मात्र या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही प्रविष्ट केला आहे.