महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत 

गृहमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश !

देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत

मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्‍यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन पथकाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. देवस्थानच्या भूमी पुन्हा मिळाव्यात, तसेच भविष्यात पुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी शासन कायदा करण्याच्या विचारात असल्याचीही या वेळी गृहमंत्र्यांनी दिली.

श्री. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हिंदूंच्या देवस्थानच्या भूमी हडप करण्यात आल्या आहेत.

२. या प्रकरणात खोटे गुन्हे  नोंदवून तक्रारदाराचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गंभीर प्रकरणाचे अन्वेषण समयमर्यादेत पूर्ण करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

३. बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील ९४ देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याची शंका व्यक्त केली.

४. आमदार रईस शेख यांनी वक्फ मंडळाची भूमीही बळकावण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा घोटाळा मोठा आहे. यामध्ये अनेक मोठे लोक सहभागी असल्याची माहिती सभागृहात दिली.

५. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देवस्थानच्या बक्षीस देण्यात आलेल्या भूमी विकल्या गेल्या आहेत. त्यांवर घरपट्टीही लागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असतांना त्यांनी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. अशा प्रकारचा कायदा सरकार करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी सरकार कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे म्हटले.

अन्य जिल्ह्यांतूनही देवस्थानच्या भूमी हडप करण्याचे प्रकार पुढे येत आहेत !

हिंदू देवस्थानच्या भूमी अवैध्यरित्या विकल्या गेल्या असतील, तर त्यावर कारवाई करण्याचे दायित्व सरकारचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतांना १२ डिसेंबर २०२१ या दिवशी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून देवस्थानच्या भूमी हडप करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बीडसह अन्य जिल्ह्यांतूनही अशी प्रकरणे पुढे येत असून या प्रकरणाचे अन्वेषण सरकार गांभीर्याने करेल, असे गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले.