‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ शालेय शिक्षणात अंतर्भूत करण्‍यासाठी ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थान’चा पुढाकार !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

आळंदी (जिल्‍हा पुणे) – संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी संतविचार आवश्‍यक असून त्‍याचे संस्‍कार प्राथमिक शिक्षणापासून देण्‍याच्‍या उद्देशाने ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्‍वतंत्र अभ्‍यासक्रम सिद्ध करण्‍यात येत आहे. त्‍यामध्‍ये संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थानने पुढाकार घेतला आहे. त्‍याचा संकल्‍प होळीच्‍या मुहूर्तावर ६ मार्च या दिवशी संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात करण्‍यात आला. ‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरी’ची हा आध्‍यात्‍मिक प्रकल्‍प तालुका, जिल्‍हा आणि राज्‍य पातळीवर चालू करण्‍यासाठीच्‍या प्रक्रियेवर बैठकीत चर्चा झाली, तसेच या प्रकल्‍पाचे पालकत्‍व घेण्‍याचा निर्णय आळंदी संस्‍थानचे प्रमुख विश्‍वस्‍त योगेश देसाई यांनी घोषित केला. या वेळी आळंदी देवस्‍थानसह विविध शाळांचे प्रतिनिधी आणि सामाजिक संस्‍था यांची उपस्‍थिती होती.

या वेळी ‘हा अभ्‍यासक्रम विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य स्‍वरूपात मिळणार असून त्‍यासाठी शाळांनी पुढाकार घ्‍यावा’, असे आवाहन करण्‍यात आले. आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्‍था आणि श्री ज्ञानेश्‍वर महाराज चरित्र समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विद्यार्थ्‍यांना एक आदर्श व्‍यक्‍ती घडवण्‍याच्‍या उद्देशाने ‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरी’ची या संस्‍कारक्षम उपक्रमाच्‍या माध्‍यमातून ज्ञानेश्‍वरीचे विचार शाळेतील मुलांना दिले जात आहे.