पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

श्री विठ्ठलाचे दर्शन घेतांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ४ मार्च (वार्ता.) – नामसंकीर्तन सभागृहाचे काम काही प्रमाणात निधीअभावी अपूर्ण असून, या सभागृहास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. नामसंकीर्तन सभागृहाच्या माध्यमातून येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल, असे आश्वासन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ३ मार्च या दिवशी त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन सभागृहाच्या कामाची पहाणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी तथा नगरपालिका प्रशासक गजानन गुरव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलतांना मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि व्यासपिठावर उपस्थित मान्यवर

‘नमामि चंद्रभागा’ योजनेला गती देणार ! – सुधीर मुनगंटीवार

आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी चंद्रभागा नदी स्वच्छ आणि निर्मळ होणे आवश्यक आहे. यासाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यात ‘नमामि चंद्रभागा’ अभियान चालू करण्यात आले होते. या अभियानाला आता गती देण्यात येणार आहे. चंद्रभागा स्नान ही वारकर्‍यांसाठी पर्वणी असते. चंद्रभागेचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तिच्या उगमापासून पुढे संगमापर्यंत नदीपात्र आणि नदीकाठ स्वच्छ रहावा, सांडपाणी थेट नदीत जाऊ नये, या दृष्टीने कामे केली जाणार आहेत, असे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. आर्यवैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि वेदांत केसरी ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी खासदार संजय जाधव, आमदार मेघनाताई बोर्डीकर, किसन महाराज साखरे, जयवंत महाराज बोधले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांचे जन्मस्थळ असलेल्या सोनपेठ (जिल्हा परभणी) या ठिकाणचा विकास करण्यासाठी तात्काळ आराखडा सिद्ध करण्यास सांगितले.