काँग्रेसचे नेते अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याची चेतावणी दिल्याचे प्रकरण

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर वैयक्तिक टीका प्रकरणी काँग्रेसचे अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक

कोलकाता – पोलिसांनी काँग्रेसचे नेते अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक केली. काँग्रेसचे बंगाल प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वैयक्तिक स्तरावर टीका केली होती. याला बागची यांनी विरोध करत ममता बॅनर्जी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याची चेतावणी दिली. त्यामुळे बागची यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ‘मुख्यमंत्री मला घाबरतात आणि हा माझा राजकीय विजय आहे’, अशी प्रतिक्रिया बागची यांनी अटक झाल्यानंतर व्यक्त केली.

१. सागरदिघी मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावर वैयक्तिक स्तरावर टीका केली होती.

२. त्यानंतर बागची यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अन् आय.ए.एस्. अधिकारी दीपक घोष यांच्या पुस्तकातील काही सूत्रांचा उल्लेख केला. या पुस्तकात तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. बागची म्हणाले, ‘‘जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका केली, तर आम्हीही या पुस्तकातील संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका करणार.’’

३. त्यांच्या या वक्तव्यानंतर बागची यांच्या विरोधात कट रचणे, दंगली भडकावण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये करणे आदी कलमे लावून त्यांना अटक करण्यात आली.