मुंबईतील पत्रकार परिषदेतील मान्‍यवरांचे विचार !

राज्‍यातील ३५ महत्त्वाच्‍या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्‍वरित हटवा ! – श्री. सुनील घनवट

१. नुकतेच रायगड, विशाळगड, कुलाबा, लोहगड, वंदनगड आदी गडांवर अतिक्रमणे झाल्‍याचे लक्षात आले आहे. श्रीक्षेत्र मलंगगड यालाही ‘हाजी मलंग’ बनवण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे. ठाण्‍यातील दुर्गाडी गडावर ईदच्‍या दिवशी नमाजपठण केले जाते. त्‍या वेळी मंदिरात पूजेलाही बंदी केली जाते. विशाळगडावरील देवतांची मंदिरे, बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु यांच्‍या समाध्‍या जीर्णावस्‍थेत आहेत. अनेक ठिकाणी गडांची दुःस्‍थिती झालेली दिसून येते. गडावरील दर्ग्‍याचे मात्र सुशोभिकरण करून अतिक्रमण वाढतच आहे.

२. हे वेळीच रोखले नाही, तर भविष्‍यात प्रत्‍येक गड-दुर्ग यांचीही अशीच स्‍थिती होईल. प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी अफझलखानाच्‍या कबरीभोवती मोठ्या प्रमाणात असलेले अतिक्रमण शिंदे-फडणवीस सरकारने हटवले आहे. त्‍याच पद्धतीने राज्‍यातील ३५ महत्त्वाच्‍या गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे हटवण्‍यासाठी तातडीने पावले उचलावीत.

श्री. सुनील घनवट

३. राज्‍य पुरातत्‍व विभागाचा १९६० च्‍या कायद्यातील शिक्षा अतिशय किरकोळ आहेत. त्‍या कठोर करण्‍यात याव्‍यात. पुरातत्‍व विभागाचे अधिकृत संकेतस्‍थळ नाही, ते संकेतस्‍थळ सिद्ध करून त्‍यावर सर्व गड-दुर्गांच्‍या संदर्भातील सर्व माहिती आणि कायदेशीर गोष्‍टी प्रसारित करण्‍यात याव्‍यात.

गडांचे इस्‍लामीकरण चालू आहे ! – राहुल खैर, मराठा वॉरियर्स गडदुर्ग संवर्धक, महाराष्‍ट्र राज्‍य

अनेक गड-दुर्ग ढासळू लागले आहेत. पुरातत्‍व विभागाकडून त्‍याकडे लक्ष दिले जात नाही. शिवप्रेमींनी गडांच्‍या स्‍वच्‍छतेची अनुमती मागितली, तर त्‍यांना अनुमती देण्‍यास विलंब लागतो. गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी शिवप्रेमींना मोर्चा काढावा लागणे, हे दुर्दैव आहे. गडांचे इस्‍लामीकरण चालू आहे. गड-दुर्ग यांसाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना आहेत. या सर्व संघटनांनी मोर्च्‍यात सहभागी व्‍हावे.

धारकर्‍यांनी महामोर्च्‍यात सहभागी व्‍हावे ! – पुरुषोत्तम बाबर, मुंबई समन्‍वयक, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

अफझलखानाच्‍या कबरीच्‍या भोवतालच्‍या अतिक्रमणावर कारवाई करण्‍यात आली, त्‍याप्रमाणे अन्‍य गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्‍यात यावे. हेही शिवरायांचे कार्य आहे. त्‍यामुळे धारकर्‍यांनी वेळात वेळ काढून या धर्मकार्यात सहभागी व्‍हावे.

गड-दुर्गांवर अतिक्रण होऊ देणार्‍या अधिकार्‍यावंर कारवाई करा ! – प्रभाकर भोसले, संस्‍थापक अध्‍यक्ष, शिवकार्य प्रतिष्‍ठान

गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणावर कारवाई होत नाही, तर दुसरीकडे हिंदवी स्‍वराज्‍यासाठी प्राणार्पण करणार्‍या मावळ्‍यांच्‍या समाध्‍यांकडे दुर्लक्ष होते. गडांची स्‍वच्‍छता करणार्‍या गड-दुर्ग प्रेमींवर पुरातत्‍व विभागाकडून कारवाई होत असेल, तर हा  भारत आहे कि पाकिस्‍तान ? ज्‍यांच्‍या काळात गड-दुर्ग यांवर अतिक्रमण झाले, त्‍या पुरातत्‍व विभागाच्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी. या मागण्‍यांसाठी काढण्‍यात येणार्‍या गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍यात अधिकाधिक शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी कुटुंबासह सहभागी व्‍हावे.

हिंदूंनो, मुंबईत होणार्‍या गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !

  • दिनांक : ३ मार्च २०२३
  • वेळ : दुपारी १२ वाजता
  • आरंभ : मेट्रो आयनॉक्‍स चित्रपटगृह
  • सांगता : आझाद मैदान
  • संपर्क : ७०२०३८३२६४

गड-दुर्गांच्‍या अस्‍तित्‍व रक्षणासाठी संघटित व्‍हा !

गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍याला राज्‍यभरात बैठका, व्‍याख्‍याने, संपर्क दौरे, हस्‍तपत्रके, फ्‍लेक्‍स यांसह सामाजिक प्रसारमाध्‍यमे यांद्वारे समाजातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हे पहा – 

_________________________________________