किनारपट्टीची धूप झाल्यामुळे १० वर्षांत गोव्यातील २८.८ हेक्टर भूमी नष्ट ! – इस्रोचा अहवाल

पणजी – इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC), अहमदाबाद यांनी बनवलेल्या संशोधन अहवालानुसार गेल्या १० वर्षांत किनारपट्टीची धूप झाल्यामुळे गोवा राज्याची सुमारे १ लाख ५२ सहस्र चौरस मीटर (१५.२ हेक्टर) भूमी पाण्याखाली गेली आहे. वर्ष २००४-२००६ ते २०१४-२०१६ या कालावधीतील आकडेवारीनुसार हा अहवाल बनवण्यात आला आहे. गोव्यातील किनारपट्टीची धूप झाल्यामुळे सुमारे २८.८ हेक्टर भूमी नष्ट झाली होती, तर १३.६ हेक्टर भूमी अभिवृद्धीद्वारे (accretion द्वारे) प्राप्त झाली होती. त्यामुळे गोव्यासाठी एकूण भूमीची हानी १५.२ हेक्टर इतकी आहे. अभिवृद्धी ही समुद्रकिनार्‍यावरील गाळ समुद्रकिनार्‍यावर साचल्यामुळे झाली आहे.

पीअर-रिव्ह्यूड जर्नल करंट सायन्समध्ये लवकरच प्रकाशित होणार्‍या या संशोधनात असे म्हटले आहे की, १० वर्षांच्या कालावधीत किनारपट्टीची धूप झाल्यामुळे भारताने ३ सहस्र ६८० हेक्टर (३६.८ चौरस किलोमीटर)हून अधिक भूमी गमावली आहे. किनारपट्टीची धूप झाल्याने कित्येक एकर भूमी नाहीशी होत आहे. यामुळे स्थानिक जीवजंतू आणि वनस्पती यांचा अधिवास अल्प होऊ शकतो आणि किनारी भागांत रहाणारे लोक असुरक्षित बनू शकतात. याचे कारण त्यांची भूमी नाहीशी होते आणि ते समुद्राच्या जवळ जातात. भूमीची अभिवृद्धी काही प्रमाणात लाभदायक ठरू शकते, कारण भूमीच्या क्षेत्रामध्ये वाढ होते; पण ही अभिवृद्धी गाळ साचल्यामुळे झालेली असल्याने सागरी जीवनाला हानी पोचवू शकते. यामुळे जलचरांसाठी त्यांच्या पाण्याची खोली अल्प होऊ शकते किंवा कासवांचा अधिवास किनार्‍यापासून दूर जाऊ शकतो.

संपादकीय भूमिका

ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कि भौतिक लाभासाठी मानवाने केलेल्या नैसर्गिक हानीचा परिणाम आहे, याचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करायला हवी !