भारत आणि चीन यांनी रशियाला अणूबाँबचा वापर करण्यापासून रोखणे महत्त्वाचे ! – अमेरिका

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी रशियाला अणूबाँबचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे विधान अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी केले. ते एका मुलाखतीत बोलत होते. रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाकडून अणूबाँबचा वापर होण्याच्या भीतीमुळे अमेरिका या बाँबचा होणारा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. यापूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.

बर्न्स यांनी सांगितले की, गेल्या वर्षी रशियाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख सर्गेई नरशकिन यांची भेट झाली होती. या भेटीत सरशकिन यांना ‘अणूबाँबचा वापर करण्यात आला, तर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी देण्यात आली होती.

रशियाला याचे गांभीर्य ठाऊक आहे. नरशकिन यांच्याशी झालेल्या चर्चेतून लक्षात आले की, पुतिन अद्याप अहंकारामध्ये आहे. पुतिन यांना ‘ते सर्व काही नियंत्रित करू शकतात, तसेच युक्रेनला नष्ट करू शकतात आणि त्याचे सहकारी युरोपीय देश रशियासमोर झुकतील’, असे वाटते.