यादगिरी (कर्नाटक) येथील चौकाला टिपू सुलतानऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यावरून तणाव

टिपूच्या नावाला हिंदु संघटनेने केलेल्या विरोधानंतर पोलिसांकडून जमाव बंदी आदेश लागू

यादगिरी येथील वादग्रस्त टिपू सुलतानचे पोस्टर

यादगिरी (कर्नाटक) – येथील हट्टीकुनी मार्गावरील एका चौकाचे नाव टिपू सुलतान ठेवण्याला हिंदु संघटनेने विरोध केला. या संघटनेने या चौकाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी करत निदर्शने केल्याने येथे तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी येथे कलम १४४ (जमाव बंदी) लागू केले आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त शा आलम हुसेन् यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.

१. या चौकाचे टिपू सुलतान असे अवैधरित्या नामकरण केल्याच्या विरोधात जय छत्रपती शिवाजी सेनेने आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. या संघटनेने म्हटले आहे की, जर हे नाव पालटले नाही, तर आम्ही गांधी चौकामध्ये निदर्शने करू. प्रशासकीय अधिकार्‍यांनी येथील टिपूच्या नावाचा फलक पुसून टाकला पाहिजे. टिपूचे नाव ठेवणे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे.

२. या संघटनेच्या म्हणण्यानुसार वर्ष १९९६ मध्ये या चौकाचे नाव महंमद अब्दुल कलाम आझाद ठेवण्यात आले होते; मात्र नगरपालिकेने वर्ष २०१० मध्ये सर्व संमतीने याचे नाव पालटून टिपू सुलतान केले. नुकतेच तेथे टिपूच्या नावाने भित्तीपत्रक आणि झेंडा लावण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना टिपू सुलतनाचे नाव कसे काय दिले जात आहे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होणारच !