मॉस्को (रशिया) – अमेरिकेसारखा एकाधिकार न ठेवता जगाला बहुकेंद्रित करण्यासाठी रशिया प्रयत्नरत आहे. वॉशिंग्टन नेहमीच स्वत:च्या अजेंड्याला पुढे रेटण्यासाठी जगामध्ये पालट करत आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाचा आदर राखून प्रत्येकाचे हित जोपासणे आवश्यक आहे, अशी भूमिका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत घेतली.
‘रशिया टुडे’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या या वृत्तानुसार पुतिन म्हणाले की,
१. आर्थिक आणि संरक्षण दृष्ट्या अमेरिकेवर पुष्कळ प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांना अमेरिकेचे अहंकारी उद्देश ठाऊक आहेत, परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
२. अमेरिकेच्या काही मित्र देशांना वाटते की, रशियाशी चालू असलेल्या संघर्षामध्ये त्यांनी अमेरिकेची बाजू घेतली, तर त्यांचे अमेरिकेशी असलेले हेवेदावे नष्ट होतील.
३. अमेरिकी सरकारकडून युरोपीय व्यवसाय अमेरिकेच्या भूमीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियाने फ्रान्समधील एका उत्पादकाशी होत असलेला करार अचानक रहित करून तो एका अमेरिकी स्पर्धक आस्थापनाशी केला. मॉस्को अशा प्रकारे कधीच वागणार नाही.
४. पाश्चात्त्य शक्तीशाली देश रशियाचे विघटन झाल्यास उदयास आलेल्या देशांना सभ्य देश म्हणून घोषित करतील. अशा प्रसंगी पाश्चात्त्य शक्ती त्या सर्व देशांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवतील, हेसुद्धा विसरता कामा नये. यामुळे रशियन जनतेचे अस्तित्वही धोक्यात येईल.
५. गेल्या आठवड्यात रशिया आणि अमेरिका यांच्यातील शेवटच्या परमाणु कराराला अचानकपणे रहित करण्यामागील रशियाची भूमिका स्पष्ट करतांना पुतिन म्हणाले की, रशियाचे संरक्षण आणि धोरणात्मक स्थिरता यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.