मराठी भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवणे आवश्यक !

आज २७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. त्या निमित्ताने…

१. इंग्रजीच्या अवडंबरामुळे भारतियांमध्ये स्वभाषेविषयी न्यूनगंड !

भारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे ‘इंग्रजी बोलता येणे’, हा हुशार असणार्‍या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे. भारतियांमध्ये स्वभाषेविषयी सतत न्यूनगंड दिसून येतो.

२. इंग्रजी ही व्यापाराची भाषा असल्याने ती जगावर थोपली गेली आहे

आज भारतच नाही, तर जपान, चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या स्वभाषेचा अभिमान बाळगणार्‍या देशांमध्येही आता इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे; कारण इंग्रजी ही व्यापाराची भाषा झाली आहे. आर्थिक व्यवहाराच्या निकडीतून इंग्रजी भाषा जगावर थोपली गेली आहे. जागतिकीकरणानंतर प्रसारमाध्यमांनीही सतत प्रगती करत जाणार्‍या इंग्रजी भाषेचा प्रभाव असलेल्या ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित केले. या वर्गाच्या तोंडात वसलेली भाषा इंग्रजी होती. त्याचा परिणाम माध्यमांच्या भाषेवरही झालेला दिसतो. आज मराठी भाषेच्या अस्तित्वाची ओरड करणारा सुशिक्षित शहरी वर्गच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतो. मराठीतील पुष्कळ मोठमोठ्या साहित्यिकांची मुले आणि नातवंडेही इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहेत.

३. ग्रामीण आणि शहरी भागांतील भाषांमधील दुभंगलेपणामुळेच बोलीभाषेला हीन दर्जा !

दुर्दैवाने माध्यमांसमोर असलेला वाचक आणि प्रेक्षक वर्ग हा शहरातील आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांची भूक असलेला पुष्कळ मोठा वर्ग निमशहरांमध्ये अन् खेड्यांमध्ये अस्तित्वात आहे; मात्र त्याची निकड जाणून घेण्यापेक्षा मराठी भाषेशी नाळ तुटलेल्या शहरी वर्गासाठी माध्यमे काम करू लागली. यातून मराठी भाषेत एक प्रकारचे दुभंगलेपण आले आहे. या दुभंगलेपणातूनच बोलीभाषांना आपण हीन लेखू लागतो. त्यातील शब्दसंपदा आपण मूळ प्रवाहात आणलीच नाही.

४. भाषेसमवेत संस्कृतीही लोप पावते !

भाषेच्या संदर्भात संपूर्ण भारतात ही स्थिती आहे. मराठीप्रमाणेच अन्य प्रादेशिक भाषांचीसुद्धा अवस्था दयनीय आहे. एक बोलीभाषा मेली की, त्यातील शब्द मृत होतात, जीवनदृष्टी मरते आणि त्या भाषेची संस्कृती लोप पावते. त्या संस्कृतीतील माणसे शेवटच्या पायरीवर येऊन नष्ट होतात, म्हणजे भाषा नष्ट होण्याची प्रक्रिया त्या भाषेतील तळाची माणसे नष्ट होण्यापर्यंत येऊन ठेपते. भारतात वर्ष १९६१ मध्ये पहिली जनगणना झाली, त्यात १ सहस्र ६५२ भाषांचा उल्लेख केला गेला; मात्र नंतर १० सहस्रांहून अल्प लोकसंख्या बोलत असलेल्या भाषा वगळायच्या, असा निकष निश्चित केल्यामुळे ही संख्या १०९ इतकी न्यून झाली. मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या आज न्यून होत आहे. ती अशीच घसरत राहिली, तर मराठी भाषाही याच पायरीवर येऊन पोचेल.

५. बोलीभाषेच्या न्यूनगंडामुळे मराठी भाषा दुर्लक्षित !

सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या सूचीत आज मराठी भाषा १५ व्या क्रमांकावर असली, तरी ती साचल्यासारखी (stagnant) झाली आहे. तिच्यात वाढ होत नाही. मग तिला फुगवण्यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर होऊ लागला. ‘जर इंग्रजी भाषेशी जुळवून घेतले, तरच मराठी भाषा टिकेल’, या समजूतीतून माध्यमांनी इंग्रजीमिश्रित मराठी भाषेचा वापर चालू केला. दुर्दैवाने या क्षेत्रात नव्याने येणार्‍या तरुणांना अनेक मराठी शब्दांचे अर्थ ज्ञात नसतात. बोलीभाषेचा न्यूनगंड यासाठी कारणीभूत आहे. तो नसता, तर आज मराठी भाषाही रसरशीत झाली असती. त्यामुळे इंग्रजीला उत्तर द्यायचे, तर आपल्या बोलीभाषांना मान द्यायला शिकले पाहिजे. या भाषा भावनांच्या भाषा आहेत. पैशाच्या भाषा नाहीत. त्यांच्याशी असलेले भावनिक नाते टिकवले पाहिजे.

– जयंत पवार
(साभार : मासिक ‘विवेक’, १३.१.२०१३)