पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बेशिस्‍त कर्मचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या विभागप्रमुखांवर कारवाई होणार !

पिंपरी (पुणे) – एका मासामध्‍ये ३ पेक्षा अधिक वेळा विलंबाने आल्‍यास किंवा केवळ एक वेळ बायोमेट्रीक अंगठा केल्‍यास त्‍या कर्मचार्‍यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे. मात्र संबंधित विभागप्रमुखांकडून ही कारवाई केली जात नसल्‍याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या निदर्शनास आले आहे. महापालिकेत अनेक विभागांमध्‍ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांच्‍या हजेरीसाठी ‘फेस रिडींग’ यंत्रणा लावली आहे. कर्मचारी ‘फेस रीडिंग’ करून बाहेर निघून जातात, अनेक कर्मचारी कार्यालयात वेळेत येत नाहीत. अशा बेशिस्‍त कर्मचार्‍यांचा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांनी २७ फेब्रुवारीपर्यंत सामान्‍य प्रशासन विभागाला पाठवावा. तसे न केल्‍यास संबंधितांवरही कारवाई करण्‍याची चेतावणी सामान्‍य प्रशासन विभागाचे उपायुक्‍त विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका 

कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई न करणारे विभागप्रमुखच कठोर शिक्षेस पात्र आहेत. अजूनही कर्मचार्‍यांवर शाळेतील मुलांप्रमाणे लक्ष ठेवायला लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेवर संस्‍कार न केल्‍याचा परिणाम !