अपघाताचा गुन्हा नोंदवतांना पोलिसांकडून चुका झाल्या आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पुणे येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण

मुंबई – पुणे येथे झालेल्या ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणांमध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जलदगतीने कारवाई केलेली आहे. त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही. या अपघात प्रकरणांमध्ये प्रारंभी योग्य पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, ती झालेली नाही. पोलिसांकडून काही चुका झालेल्या आहेत, त्या मान्यच आहेत, अशी स्पष्टोक्ती गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देतांना फडणवीस बोलत होते.

आता थेट बडतर्फीची कारवाई होणार !

‘पुणे शहराची ओळख सांस्कृतिक आहे. ते शिक्षणाचे माहेरघर म्हणून आहे. त्याची अपकीर्ती करू नका. अमली पदार्थांची विक्री, वहन, साठवणूक आदी प्रकरणांमध्ये कोणताही पोलीस कर्मचारी असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो, आता त्यांना निलंबित न करता थेट बडतर्फ करण्यात येईल’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.