दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार !; भिंत कोसळून वृद्ध घायाळ !…

डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार !

पनवेल – डंपरच्या धडकेत कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई अरुण कर्ले ठार झाले आहेत. पत्नीसमवेत दुचाकीवरून जात असतांना हा प्रकार घडला. त्यांची पत्नी या दुर्घटनेत घायाळ झाली आहे.


भिंत कोसळून वृद्ध घायाळ !

ठाणे – ठाणे रेल्वेस्थानक येथे २० फूट उंच संरक्षण भिंतीचा भाग कोसळून नरेंद्र कोळी (वय ६२ वर्षे) हे गृहस्थ घायाळ झाले आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही भिंत २ वर्षांपूर्वीच बांधली होती. भूमी खचल्याने भिंतीचा भाग कोसळला.


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास २० वर्षांचा कारावास !

डोंबिवली – येथे ९ वर्षांच्या मुलीला बळजोरीने फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि २० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास १ महिनी आणखी कारावास भोगावा लागेल. शशिकांत सोनावणे असे आरोपीचे नाव आहे.


समुद्रात बुडणार्‍या महिलेला वाचवले !

मुंबई – मरीन ड्राईव्ह येथे पर्स घेण्याच्या नादात ६९ वर्षीय महिला समुद्रात बुडली होती. ही माहिती मिळताच दोघा जवानांनी तिला वाचवले. हे बचावकार्य २० मिनिटे चालले. रिंग, टायर आणि दोरी यांचा वापर करून महिलेला बाहेर काढण्यात आले.


पुणे शहरात पकडले ३०० किलो प्लास्टिक

पुणे – महापालिकेने स्थापन केलेल्या केंद्रीय प्लास्टिक विरोधी पथकाने २७ जूनला शहरात बंदी असलेल्या ३०० किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्या वाहतुकीच्या वेळी पकडल्या. या वेळी टेंपोचालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्याकडून १० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पालखी सोहळ्याच्या काळात प्लास्टिकचा वापर वाढू नये, यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई चालू करण्यात आली आहे. (अशा प्रांसगिक कारवाईचा काय उपयोग ? – संपादक)


पुणे शहरात ‘झिका’चे ३ रुग्ण सापडले !

पुणे – मुंढव्यातील कोद्रेवस्ती परिसरात ४७ वर्षीय महिलेचा खासगी प्रयोगशाळेतील पडताळणी अहवाल ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे; पण त्याचा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचा पडताळणी अहवाल आरोग्य विभागाला मिळालेला नाही. एरंडवणा भागातील एक आधुनिक वैद्य आणि त्यांची मुलगी यांनाही झिकाचा संसर्ग झाला आहे. कोद्रेवस्ती येथील महिलेला वारंवार ताप येत होता.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांना पत्र पाठवून सांगितले, ‘‘रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेने ताप रुग्णांचे सर्वेक्षण करावे. परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी.’’