सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – गत अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या ‘श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुला’तील जलतरण तलावाचे नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले. १ कोटी ३५ लाख रुपये व्यय करून जलतरण तलाव, फिल्टरेशन प्लाँट आणि इतर गोष्टी यांचे नूतनीकरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता हा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.
शहरातील मोती तळ्याजवळील जलतरण तलाव केव्हा चालू होणार ?
शहरातील मध्य वस्तीत असणार्या नगरपालिकेच्या मालकीच्या मोती तळ्याजवळील जलतरण तलाव अद्याप चालू केलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव गणपति मूर्ती विसर्जनासाठी उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत पोहण्याचा आनंद लुटण्यापासून मुले-मुली वंचित रहात आहेत. याविषयी अनेक वेळा नगरपालिकेकडे प्रश्न उपस्थित करूनही त्यावर कोणताही उपाय काढला जात नाही. ‘श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुला’तील जलतरण तलाव हा गावापासून ३-४ किलोमीटर लांब असल्यामुळे गावातील नागरिक मुलांना घेऊन एवढ्या लांब पोहायला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे गावातच असलेला नगरपालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव केव्हा चालू होणार ? असा प्रश्न सूज्ञ सातारावासीय उपस्थित करत आहेत.