|
सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील जुगार क्षेत्रातील मोठा बुकी शमीम उपाख्य सलीम कच्छी याच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड घातली. या वेळी पोलिसांनी १६ लाख २६ सहस्र ७० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेऊन कच्छी आणि त्याचे सहकारी यांवर गुन्हा नोंद केला.
शमीम उपाख्य सलीम कच्छी हा सातारा जिल्ह्यातील जुगार उद्योगातील प्रमुख आहे. यातील आर्थिक गोष्टी त्याच्या निर्देशानेच चालतात. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यांनी तातडीने एक पथक सिद्ध करून जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचे नियोजन केले. त्यानुसार पथकाने कारवाई करत कच्छी याच्या सैदापूर येथील निवासस्थानी धाड टाकली. या वेळी निवासस्थानी २० हून अधिक व्यक्ती जुगार खेळतांना आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम कह्यात घेतली.
अनेक वेळा अटक आणि सुटका..!
सलीम कच्छी हे सातारा जिल्ह्यातील जुगार क्षेत्रातील मुख्य नाव आहे. अनेक ठिकाणी कच्छी याच्या निर्देशाने जुगार अड्डे चालतात; मात्र प्रत्येक वेळी कारवाई होते, जुगाराचे साहित्य पोलीस कह्यात घेतात, गुन्हा नोंद करतात, अटक होते, जामीन मिळतो, गुन्हेगार सुटतो. पुन्हा जुगार अड्डा चालू होतो, असे दुष्टचक्र सतत चालू आहे. पोलीस करत असलेली कारवाई केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी आहे कि काय अशी शंका नागरिकांना येते. आतापर्यंत अनेक वेळा सलीम कच्छी याला पोलिसांनी जुगार अड्डे चालवतांना रंगेहात पकडले आहे; मात्र त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलीस-प्रशासनाने आणि न्याययंत्रणेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.