इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर केलेल्या आक्रमणात ५ जण ठार

दमास्कस (सीरिया) – इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस येथील निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यात ५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. वर्ष २०११ मध्ये इस्रायलने त्याच्या शेजारी असलेल्या देशांमध्ये १०० हून अधिक हवाई आक्रमणे केली आहेत. यांमध्ये प्रामुख्याने इराणी आणि सीरिया यांचे सैनिकी तळ आणि लेबनॉनच्या हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेच्या तळांचा समावेश आहे.

हे सर्व देश सीरियाचे मित्र समजले जातात. इस्रायली सैन्य सीरियावरील आक्रमणांविषयी क्वचित् भाष्य करते; मात्र ‘इस्रायलला लागून असलेल्या सीमेच्या परिसरात इराणी सैन्याला प्रभाव वाढू देणार नाही’, असे इस्रायल सातत्याने सांगत असतो. साधारण दीड मासापूर्वी इस्रायलने दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले होते. त्यात २ सैनिकांसह ४ नागरिक ठार झाले होते.