कर्नाटककडून कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

म्हादई जलवाटप तंटा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

पणजी, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कर्नाटक सरकारने १७ फेब्रुवारी या दिवशी वादग्रस्त कळसा-भंडुरा प्रकल्प उभारणीसाठी १ सहस्र कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याची घोषणा केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडतांना ही घोषणा केली.

मुख्यमंत्री बोम्माई अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले, ‘‘कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डी.पी.आर्.ला) संमती दिल्याने मी कर्नाटकवासियांच्या वतीने पंतप्रधान आणि केंद्रशासन यांचे आभार व्यक्त करतो. कर्नाटक सरकारने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे केंद्रीय जल आयोगाने प्रकल्पाच्या ‘डी.पी.आर्.’ला संमती दिली. म्हादई पाणी लवादाने कर्नाटकला म्हादईचे ३.९ टी.एम्.सी. पाणी वापरण्यास अनुमती दिली आहे. कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम जलद गतीने चालू केले जाणार आहे.’’

कर्नाटकच्या ‘डी.पी.आर्.’ला केवळ तांत्रिक मान्यता ! – अभिराम कुमार, अवर सचिव, जलस्रोत खाते, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय

कर्नाटकच्या म्हादई नदीवर उभारण्यात येणार्‍या कळसा-भंडुरा प्रकल्पांना दिलेली मान्यता ही केवळ तांत्रिक स्वरूपाची आहे.‘हायड्रोलॉजी’ आणि आंतरराज्य निकष यांनुसार ‘डी.पी.आर्.’ला मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच संबंधित अंतिम मान्यता देण्यात येणार आहे, असा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलस्रोत खात्याचे अवर सचिव अभिराम कुमार यांनी केला आहे.

गोव्यात तज्ञ समितीची अद्याप स्थापना नाही !

म्हादईप्रश्नी गोवा विधानसभेत स्थापन करण्यात आलेल्या सभागृह समितीच्या पहिल्या बैठकीत तज्ञ समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र अजूनही तज्ञ समितीची स्थापना करण्यात आलेली नाही.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा