(म्हणे) ‘भजनास आमंत्रित गायक कट्टर हिंदु असल्याने हिंसा करू !’ – खलिस्तानवादी, ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांची हिंदुविरोधी कृत्ये चालूच !

महिला पुजारी भावना आणि कट्टर हिंदुत्ववादी कन्हैया मित्तल

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – गेल्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलियातील ३ हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या घटना समोर आल्यानंतर आता येथील काली माता मंदिरातील महिला पुजार्‍याला धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. २४ जानेवारी या दिवशी येथील भावना नावाच्या महिला पुजार्‍याला एका खलिस्तानवाद्याचा धमकीचा भ्रमणभाष आला. ‘४ मार्च या दिवशी होणार्‍या भजनाच्या कार्यक्रमात कन्हैया मित्तल या गायकाला आमंत्रित करण्यात आल्याने संबंधित खलिस्तानवाद्याने मित्तल यांना बोलावल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे म्हटले. मित्तल हे ‘कट्टर हिंदु’ असल्याने ते कार्यक्रमासाठी आल्यास मंदिरावर आक्रमण करू, अशी धमकीही या खलिस्तानवाद्याने भावना यांना दिली.

१. भावना यांनी ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ या नियतकालिकाला दिलेल्या माहितीनुसार त्यांना या घटनेमुळे धक्का बसला असून त्यांनी संबंधित व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ‘स्वत: गुरु महाराजही (गुरु गोविंद सिंहही) कालीमातेची उपासना करत’, असे सांगूनही खलिस्तानवाद्याने भावना यांचे काहीच ऐकून घेतले नसल्याची माहिती भावना यांनी दिली.

२. भावना यांनी क्रेगबर्न पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली असून भजन कार्यक्रमाच्या दिवशी मंदिराला संरक्षण पुरवण्याची विनंती केली आहे.