बांदा (उत्तरप्रदेश) येथे मशिदीचे अवैध नूतनीकरण बजरंग दल आणि विहिंप यांच्या कार्यकर्त्यांनी रोखले !

घटनास्थळ

बांदा (उत्तरप्रदेश) – येथील पद्माकार चौकात एका मशिदीचे नूतनीकरण चालू असतांना विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ते थांबवले. येथील साहित्य फेकून दिले. या वेळी पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर स्थिती नियंत्रणात आली. या काळात येथील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी ‘बुंदेलखंड इंसाफ सेने’कडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन पाठवून नूतनीकरण रोखणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासन आता दोन्ही बाजूंकडील लोकांशी चर्चा करत आहे. त्यांना दंडाधिकार्‍यांकडे नेऊन यावर मार्ग काढण्यात येणार आहे.

बजरंग दलाचे म्हणणे आहे की, मशिदीचे नूतनीकरण करतांना अनुमतीच्या व्यक्तीरिक्त येथे अवैध बांधकाम करण्यात येत होते. ते रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रशासनाने हे अवैध बांधकाम थांबवणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

अशी घटना प्रशासनाला लज्जास्पद ! जे काम प्रशासनाने करायला हवे, ते करण्यासाठी हिंदु संघटनांना कायदा हातात घेऊन पुढाकार का घ्यावा लागतो ? उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना हे अपेक्षित नाही !