कोल्हापूर – कणेरी येथील सिद्धगिरी मठाने अध्यात्मासमवेत कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, संस्कृतीरक्षण, गोसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन अशा प्रत्येक क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. याच श्रृंखलेत पर्यावरण रक्षणासाठी आता होणारा पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल. २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. सध्या पर्यावरण हानीच्या अनेक घटना आपण पहात आहोत. त्सुनामी, भूकंप, अतीवृष्टी, महापूर यांसारख्या समस्यांना जगाला तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांचा आपण विचार केला नाही, तर येणार्या काळात जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
२. या लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या तत्त्वांचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण, भविष्यात ही तत्त्वे मूळ रूपात आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांचा समावेश आहे.
३. भारताचे पारंपरिक ज्ञान आणि त्या संबंधी विविध संशोधन कार्याची ओळख सहभागी लोकांना होणार आहे. या उत्सवात लोकांना जैविक खत, देशी बियाणे, तसेच जैविक किड नियंत्रण लोकांना समजावून घेता येणार आहे. हा लोकोत्सव म्हणजे रासायनिक-विषमुक्त अन्न-धान्य यांच्याकडे टाकलेले एक समग्र पाऊल ठरेल.