तीर्थक्षेत्रांविषयी राजकारण्यांचे नव्हे, धर्मशास्त अभ्यासकांचे मत ग्राह्य धरावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

भीमाशंकर देवस्थान

मुंबई – इतिहास, धर्मशास्त्र, तीर्थक्षेत्र यांविषयी राजकीय व्यक्तींनी भाष्यच करू नये. हा अधिकार ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास करणार्‍यांचा किंवा धर्मशास्त्राच्या अभ्यासकांचा आहे, असे स्पष्ट मत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. भीमाशंकर देवस्थानाविषयी माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.

भीमाशंकर हे देवस्थान १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचा आसाम सरकारचा दावा नाही !

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यानुसार आपण जायला हवे. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने ज्योतिर्लिंगांविषयी वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या परिपत्रकामध्ये पुणे येथील ‘भीमाशंकर’ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. याविषयी आसाम सरकारशी संपर्क साधला असता तेथील भीमाशंकर हे देवस्थान १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचा त्यांचा दावा नाही.

ऐतिहासिक तथ्यामध्ये आम्ही कोणताही दावा करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जे नेते याविषयी टीका करत आहेत, त्यांना यामध्ये राजकारण करायचे आहे. टीका करणार्‍या राजकीय नेत्यांना इतिहासात किती गुण मिळाले, हे मला ठाऊक नाही; परंतु ‘आम्ही मोठे इतिहासकार आहोत’, असे त्यांना वाटत आहे.’’