तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपबळींची संख्या २८ सहस्रांहून अधिक !

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २८ सहस्र १९२ इतकी झाली आहे. घायाळ झालेल्यांची संख्या ७८ सहस्रांहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्रांचे एक पदाधिकारी मार्टिन ग्रिफिथ्स यांनी ‘या भूकंपातील मृतांची संख्या दुप्पट होऊ शकते’, अशी भीती व्यक्त केली आहे.

भूकंपानंतर साहाय्यता कार्यात अनेक अडथळे येत आहेत. येथे साचलेल्या ढिगार्‍याखाली अनेक जण अद्यापही गाडले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लुटमारीच्या घटना वाढल्या : ४८ जणांना अटक

एकीकडे भूकंपग्रस्तांना साहाय्य करून मानवता जपली जात असतांनाच दुसरीकडे भूकंपग्रस्तांना लूटले जात असल्याचे अमानवी चित्र दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतपर्यंत ४८ जणांना अटक केली आहे. मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या या प्रकारांमुळे सामाजिक माध्यमांद्वारे संताप व्यक्त केला जात आहे.

टॅटूमुळे पटली एका भारतियाच्या मृतदेहाची ओळख

तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. घटनेच्या ५ दिवसांनंतर ‘टॅटू’मुळे (नवरूढी म्हणून शरीरावर कायमस्वरूपी गोंदवलेली नक्षी किंवा अक्षरे) त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. मूळचे उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि बेंगळुरू येथील एका आस्थापनात काम करणारे विजय कुमार गौड हे आस्थापनाच्या कामानिमित्त तुर्कस्तानातील मलत्या येथे गेले होते. ते ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, ते हॉटेल भूकंपात पडले आणि त्याच्याच ढिगार्‍याखाली विजय हे गाडले गेले.

या ढिगार्‍यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांचा तोंडावळा पूर्णपणे चिरडलेला असल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.