दिवाडी बेटावर पुन्हा श्री सप्तकोटीश्वर मंदिर बांधू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

(उपसंपादक श्री. चेतन राजहंस यांच्याकडून)

गोमंतकचे राजदैवत श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे शिवघोषात लोकार्पण !

छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६८मध्ये जीर्णोद्धार केलेले श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर

नार्वे (डिचोली) – आज सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. पोर्तुगिजांच्या धार्मिक छळवादामुळे ज्या दिवाडी बेटावरून श्री सप्तकोटीश्वर देवाची मूर्ती आणली होती, त्या दिवाडी बेटावर पुन्हा श्री सप्तकोटीश्वर मंदिर बांधू, असा संकल्प करतो. हे मंदिर पोर्तुगिजांच्या मंदिरे उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्यांचे स्मारक असेल, अशी घोषणा ११ फेब्रुवारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद यांनी केली. नार्वे, डिचोली येथे शंखनाद आणि ढोल, ताशे अन् तुतारी यांचा निनाद; शिवछत्रपतींच्या अस्मिता जागवणारा घोष, कवी भूषणच्या शिवबावनीचा उच्चार, स्वातंत्र्यवीर सावरकरकृत शिवछत्रपतींच्या आरतीचे गान, अशा प्रारंभीच्या भव्य दिव्य कार्यक्रमांद्वारे जीर्णाेद्धार केलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे लोकार्पण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि शिवछत्रपतीचे वंशज तथा साताराचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले. या वेळी डॉ. सावंत यांनी वरील महत्त्वपूर्ण घोषणा केली.

पिंडीवर सपत्नीक जलाभिषेक करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई

गोव्याची मंदिरांची भविष्यातील दिशा स्पष्ट ! – पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक

दिवाडी बेटावर श्री सप्तकोटीश्वराचे भव्य दिव्य मंदिर उभे राहील, असा आता मला विश्वास आहे. आपली मंदिरे शाश्वत आहेत. गझनीच्या महंमदाने १७ वेळा सोमनाथ मंदिर तोडले; पण प्रत्येक वेळी मंदिर उभे राहिले. मोगलांनी अनेक मंदिरे पाडली; पण अहिल्याबाई होळकर यांनी ती पुन्हा उभारली. आज श्रीराममंदिरही उभे रहात आहे. त्यामुळे सर्व मंदिरे शापित इतिहास पुसून पुन्हा उभी रहातील, या दृष्टीने गोव्यातील मंदिरांची भविष्यातील दिशा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे.

क्षणचित्रे

उपस्थिती : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, फातोर्डाचे आमदार तथा मंदिराचे महाजन विजय सरदेसाई, सप्तकोटीश्वर मंदिराचे अध्यक्ष उदय सरदेसाई आणि इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे

लोकार्पण सोहळ्याच्या प्रारंभी माननीय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी श्री सप्तकोटीश्वर मंदिरावर १९३४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.

गेले ३ दिवस या मंदिराच्या जीर्णाेद्धााचे विधी चालू होते. या अंतर्गत पुण्याहवाचन, लघुरुद्र, महाभिषेक, जीर्णाेद्धार होम आदी विधी करण्यात आले. ११ फेब्रुवारीला गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील पवित्र स्थानांतील जलाने पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पोर्तगिजांनी लिहून ठेवलेल्या गोव्यातील मंदिरांच्या विध्वंसाच्या नोंदीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने ५ सदसीय समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल लवकरच बाहेर येईल. त्या वेळी किती मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, ते कळेल. त्या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार हा आमचा संकल्प आहे. गोव्यात हिंदु धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्यामुळे गोव्यात पोर्तुगिजांनी तह करून स्पष्ट केले की, आम्ही हिंदूंचे धर्मपरिवर्तन करणार नाही आणि मंदिरे उद्ध्वस्त करणार नाही. आमच्या सरकारने गोवा विद्यापिठात गोवा आणि शिवछत्रपती या विषयांचा अभ्यासक्रम चालू केला आहे. यातून भविष्यात अनेक संशोधक सिद्ध होतील आणि ३५० वर्षांपूर्वीचा शिवइतिहास सांगतील.’’

मान्यवरांचे उद्गार !

राजाचे काम जनता, राज्य आणि धर्म यांचे रक्षण करणे ! – श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे

छत्रपती घराणे आणि गोव्याचे नाते काय आहे ? हे मला समजले. मी शिवछत्रपतींचा तेरावा वंशज आहे. तुम्ही वर्ष १६६८ मधील नार्वेवासियांचे वंशज आहात, ज्यांनी तो शिवसोहळा पहिला होता. राजाचे काम जनता, राज्य आणि धर्म यांचे रक्षण करणे असते. या दृष्टीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राजा म्हणून सप्तकोटीश्वरचा जीर्णोद्धार करून धर्म पाळला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

शिवछत्रपती हे आद्य राष्ट्रवादी आणि हिंदु जननायक होते. त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या सप्तकोटीश्वर मंदिराच्या पुन्हा जीर्णाेद्धार करून लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले याचा आनंद आहे,

मंत्री सुभाष फळदेसाई

शिवछत्रपतींनी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीला चेतावणी देण्यासाठी श्री सप्तकोटीश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली. आज पुन्हा श्री सप्तकोटीश्वरचा जीर्णोद्धार होऊन या राजदैवतावर आभिषेक करतांना आम्हाला आनंद होत आहे. याचे श्रेय माननीय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना जाते.

आमदार विजय सरदेसाई

आमच्या कुलदैवतासाठी आलो. या मंदिराचा जीर्णाेद्धार करणार, अशी भाजप शासनाने पूर्वी घोषणा केली होती; परंतु आता चांगले कार्य पूर्ण झाले आहे.

प्रा. भूषण भावे, विद्या प्रबोधिनी, पर्वरी

श्री सप्तकोटीश्वर हे गोमंतकचे अधिष्ठान दैवत आहे. महाभारतमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. पोर्तुगीज प्रवासी आंद्रे यांनी लिहिले आहे की, ‘जसे ख्रिस्ती जेरुसलेम येथे जातात, तसे गोमंतकीय दिवाडीच्या श्री सप्तकोटीश्वरच्या दर्शनाला जातात.’

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, ‘‘हा आमच्या गोमंतकीय जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. यासाठी मयेवासियांचा प्रतिनिधी म्हणून भाजप शासनाचे आणि पुरातत्व विभागाचे आभार व्यक्त करतो.’’

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार घराण्याच्या वशजांचा सन्मान करण्यात आला.

गोव्याच्या धार्मिक वैभवामध्ये भर पडणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

१२ व्या शतकातील कदंब राजसत्तेच्या काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि पुरातन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेले गोव्यातील श्री सप्तकोटीश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. ३५० वर्षांनंतर म्हणजे २०१८ वर्षी या श्रद्धास्थानाचा जीर्णाेद्वार करण्यात आला आहे. मुंबई येथील वास्तूविधान प्रकल्पाचे वास्तू सल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा जीर्णाेद्वार झाला आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या सरदार घराण्यातील वंशजांच्या हस्ते विधिवत् पूजार्चना करून मंदिर भाविकांसाठी खुल झाले आहे. यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. यामुळे गोव्याच्या धार्मिक वैभवामध्ये नक्कीच भर पडणार आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून व्यक्त केले.

शासनाने इतर ऐतिहासिक स्थळांचाही जीर्णाेद्वार करावा ! – युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

श्री सप्तकोटीश्वर मंदिराचा शासनाने केलेला जीर्णाेद्वार स्वागतार्ह आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदान; कुंकळ्ळी, असोळणे आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके आणि पणजी येथील आझाद मैदान जिर्णाेद्वाराच्या प्रतीक्षेत आहे, हेही ध्यानात घ्यावे, असे मत गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.

विशेष उपस्थिती

  • महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार राजू भोसले
  • प्रा. सुभाष वेलिंगकर, निमंत्रक, भारत माता की जय संघ
  • महाराष्ट्रातील सरदार घराण्याचे वंशज