पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी खात्याकडे १९ अर्ज

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केली मंदिर

पणजी –पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी गोवा शासनाने २० कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय प्रावधान केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडे आतापर्यंत १९ अर्ज आलेले आहेत, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. नार्वे, डिचोली येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पत्रकारांनी पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीविषयीही विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘मंदिर पुनर्बांधणीविषयी अभ्यास करणारी समिती अर्जदारांनी दिलेली माहिती, प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आणि गावातील जाणकारांकडून माहिती घेऊन, तसेच पुरातत्व खात्यामध्ये असलेल्या पुरातन कागदपत्रांची माहिती यांची पडताळणी करून नंतर योग्य तो निर्णय घेणार आहे. ही लांबलचक प्रक्रिया आहे. समितीला पडताळणीसाठी एक मासाचा अवधी देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास हा अवधी वाढवण्यात येणार आहे. पोर्तुगिजांनी जे आदेश काढले होते, त्या सर्वांची कागदोपत्री माहिती उपलब्ध आहे.

 (सौजन्य : Goan Reporter News)

चर्च आणि मशिदी पोर्तुगिजांनी पाडलेल्या असल्यास त्यासाठी सरकार निराळी योजना राबवू शकते

सरकारची विद्यमान योजना ही केवळ मंदिरांसाठी आहे; मात्र आतापर्यंत आलेल्या १९ अर्जांमध्ये खांडेपार येथील एका मशिदीचाही समावेश आहे. चर्च आणि मशिदी पोर्तुगिजांनी पाडलेल्या आहेत आणि त्यांची पुनर्बांधणी करण्याची मागणी असल्यास त्यासंबंधीचा प्रस्ताव पुरातत्व खाते सरकारकडे मांडणार आहे. याविषयी सरकार योग्य निर्णय घेणार आहे.’’