अभिलेखावरील आरोपीने केलेल्‍या १७ घरफोड्या पोलीस अन्‍वेषणात उघड ! – समीर शेख, सातारा पोलीस अधीक्षक

गुन्‍हेगार संजय अंकुश मदने याने १७ घरफोड्या केल्‍या असल्‍याचे पोलीस अन्‍वेषणात उघड झाले आहे. यामध्‍ये ६२ तोळे सोन्‍याचे दागिने आणि ४ सहस्र रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा ३४ लाख ७२ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल शासनाधीन (चित्र सौजन्य : नवराष्ट्र)

सातारा, २ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्‍ह्यात घरफोड्या करणारा अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्‍हेगार संजय अंकुश मदने याने १७ घरफोड्या केल्‍या असल्‍याचे पोलीस अन्‍वेषणात उघड झाले आहे. यामध्‍ये ६२ तोळे सोन्‍याचे दागिने आणि ४ सहस्र रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा ३४ लाख ७२ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल शासनाधीन करण्‍यात आला आहे, अशी माहिती सातारा जिल्‍हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा जिल्‍हा पोलीस अधीक्षक समीर शेख

जिल्‍हा पोलीस अधीक्षक समीर शेख म्‍हणाले की, या घरफोड्या वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीतील आहेत. आरोपी मदने याने जिल्‍ह्यातील वडूथ, बोरखळ, मालगाव, जळगाव, तडवळे, खेड-नांदगिरी, चिमणगाव, देऊर, वाठार या गावांमध्‍ये घरफोड्या केल्‍याचे मान्‍य केले आहे. मदने याच्‍यासमवेत मोठी टोळी कार्यरत असल्‍याची शंका पोलिसांना आहे. त्‍या दिशेने अन्‍वेषणात चालू असून त्‍याच्‍याशी संबंधित अन्‍य संशयित अन्‍वेषणाच्‍या कक्षेत आहेत.