‘सध्या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या करूनही काही निष्पन्न होतांना किंवा अनेक उपचार घेऊनही फारसा लाभ होतांना दिसत नाही; परंतु अशा त्रासांना प्रतिबंध म्हणून आयुर्वेदाचे काही समादेश (सल्ले) रुग्णांसाठी लाभदायक ठरतात.
वरील त्रास थंडीमध्ये वारंवार होण्यामागे दिनचर्येतील एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्हणजे सध्या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्यावरुन अंघोळ) करणे’. असे न करता ज्याप्रमाणे काही स्त्रिया सप्ताहातून एकदा किंवा दोनदा शिरःस्नान करतात, त्याप्रमाणे किमान हिवाळ्यामध्ये जर विशेषतः पुरुषांनी (कारण ते बहुधा प्रतिदिन शिरःस्नान करतात) किंबहुना सर्वांनीच सप्ताहातून एकदा किंवा दोनदाच शिरःस्नान करावे. शिरःस्नान केल्यानंतर डोके व्यवस्थित पुसून पाण्याचा अंश केसांमध्ये रहाणार नाही, अशा प्रकारे केस कोरडे केले, तर अनेकांची वरील त्रासांपासून सुटका होऊ शकते.
(सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे)
थंडीच्या कालावधीमध्ये प्रतिदिन डोक्यावरून अंघोळ करणे टाळता आले, तर ते निश्चित उपयोगी ठरते. हा पालट अवश्य करून पहा आणि निरोगी रहा !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२५.१२.२०२२)