सातारा, ३० जानेवारी (वार्ता.) – वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शहरातून पायी गस्त घालत नवीन उपक्रमाला प्रारंभ केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी समर्थ मंदिर परिसरात पायी पहाणी दौरा करत या उपक्रमाला प्रारंभ केला. या वेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश पतंगे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, पूर्ववैमनस्यातून आणि किरकोळ कारणावरून होणारे वाद विकोपाला जात आहेत. त्यातूनच मोठमोठे गुन्हे घडत आहेत. पोलीस खात्याची जरब बसावी, यासाठी शहरातून पायी गस्त घालण्याचा उपक्रम जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करून हा उपक्रम राबवणार आहेत. याचा निश्चितच चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.
कोयता गँगची दहशत आणि वाढे फाटा येथील हत्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाकांक्षी आहे. यामुळे सातारा पोलीस दलाची जरब गुन्हेगारांवर बसणार असून पोलीसदलाचेही मनोबल वाढण्यास साहाय्य होणार आहे, असे मत सूज्ञ सातारावासिय व्यक्त करत आहेत. |