ग्रामसुधारणा समिती, जमालपूर आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेले हिंदूजागृती संमेलन
गुरुग्राम (हरियाणा) – बरेच जण ‘भारत हे हिंदु राष्ट्रच आहे’, असे सांगतात; पण आपण लक्षात घेतले पाहिजे की, वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करून ‘भारत निधर्मी राष्ट्र आहे’, असे घोषित करण्यात आले. त्यामुळे जोपर्यंत देशाची राज्यघटना आणि संसद ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे घोषित करत नाही, तोपर्यंत आपण मनाने कितीही भारताला हिंदु राष्ट्र मानले, तर त्याचा काहीच उपयोग नाही. हा देश हिंदु राष्ट्र घोषित झाल्यासच हिंदूंच्या सर्व समस्यांचे निवारण होणार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
२६ जानेवारी या दिवशी येथील जमालपूर गावात हिंदूजागृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. हे संमेलन ग्रामसुधारणा समिती, जमालपूर आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केले होते. या संमेलनात सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ विषद केले. या वेळी जमालपूर, पटौदी आणि आजूबाजूच्या गावातील १२५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
विशेष
१. या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे संकेतस्थळाचे वाचक श्री. देश राज यादव यांनी पुढाकार घेत गावातील अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्याने केले. त्यांनी गावात २ सहस्र पत्रकांचे वाटप करण्यासह कार्यक्रमासाठी मंदिर उपलब्ध करणे, बैठका, ध्वनीक्षेपक यंत्रणा आदी सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.
२. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी सांगितले की, आजपर्यंत आम्हाला वाढदिवस शास्त्रानुसार साजरा करण्याविषयी कुणीच सांगितले नाही. येथून पुढे आम्ही तो शास्त्रानुसार साजरा करू. तसेच प्रत्येक सप्ताहात धर्मशिक्षणवर्गाला उपस्थित राहू.