काश्मीर विसरून जा आणि भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणा !

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला सुनावले !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणण्याचे स्पष्टपणे बजावल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी पाकमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे उघड केले आहे. काश्मीरविषयीचे कलम ३७० हटवण्यावर आकांडतांडव करण्यापेक्षा गप्प रहाण्याचाही सल्ला पाकला या देशांकडून देण्यात आल्याचे यात म्हटले आहे.

कामरान युसूफ यांनी लेखात म्हटले आहे की,

१. इस्लामी देशांच्या संघटनेमध्ये पाकिस्तान सातत्याने काश्मीरविषयीचे सूत्र उपस्थित करत होता. ही संघटना मुळात सौदी अरेबियाच्या ईच्छेनुसार वागते. आता या संघटनेने स्पष्ट केले आहे की, ती पाकला काश्मीरच्या सूत्रावर साथ देणार नाही. त्यामुळे आता पाकसमोर ही स्थिती आहे की, काश्मीरचा विषय मांडत रहायचा कि अर्थव्यवस्था वाचवायची ?

२. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांचे भारताशी संबंध अधिक भक्कम झाले आहेत. भारताची इच्छा आहे की, या दोन्ही देशांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी आणि पैसे कमवावेत. हे दोन्ही देशही तेलाच्या व्यापारसह अन्य मार्गानेही पैसे कमावू इच्छित आहेत.

३. या दोन्ही देशांचे उद्योगपती काश्मीरच्या संदर्भात भारताने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. यामुळे पाकच्या ‘काश्मीर वादग्रस्त भाग आहे’, या सूत्राला झटका बसला आहे. पाकने जेव्हा या बैठकीला उपस्थित रहाण्यावरून या दोन्ही देशांना विरोध केला, तेव्हा या दोन्ही देशांनी ‘आता आम्ही पाकला सार्वजनिक स्तरावर कोणताही साथ देणार नाही. आम्ही भारताशी संबंध ठेवण्याला अधिक महत्त्व देतो’, अशा शब्दांत पाकचे कान उपटले.

४. यामुळेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यावर असतांना भारताशी पाकचे संबंध सुधारण्याविषयीचे विधान केले होते.