अंमलबजावणी संचालनालयाकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे धाडसत्र !

आयकर परताव्याच्या संदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण

आयकर अधिकार्‍यांकडून आलिशान गाड्या आणि १६६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) धाडी टाकल्या. आयकर विभागाचे वरिष्ठ कर साहाय्यक तानाजी मंडल आणि इतर यांनी आयकर विभागाकडून बोगस मार्गाने उपलब्ध झालेला २६३ कोटी रुपयांचा परतावा वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, पनवेल, कर्जत, तसेच कर्नाटकमधील उडुपी येथील भूमी जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे बीएम्डब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी यांच्यासारख्या आलिशान गाड्या, तसेच मुंबई, पनवेल येथील घरे अशी सुमारे १६६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अतिरिक्त महासंचालक यांच्याकडून लेखी तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या देहली विभागाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या तक्रारीवर ईडीचे अन्वेषण चालू आहे.

तानाजी मंडल यांनी त्यांच्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करून त्यांचे ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ मिळवले. त्याद्वारे वरिष्ठांची फसवणूक केली. मंडल साहाय्यकांना आयटी विभागाकडे बनावट टी.डी.एस्. सादर करण्यास सांगत असे. त्यानंतर वरिष्ठांचा लॉग इन तपशील वापरून वरिष्ठ अधिकार्‍याच्या खात्याद्वारे ‘बोगस रिफंड’ सहकार्‍यांच्या बँक खात्यात वळवत होते. तानाजी मंडल यांनी २६३ कोटी रुपयांची रक्कम एस्बी एंटरप्रायझेस नावाच्या अधिकोष खात्यात जमा केली. या सर्व पैशांचे नियंत्रण मंडल यांचे सहकारी भूषण पाटील यांच्याकडे होते. ईडीच्या अन्वेषणात असे आढळून आले की, नोव्हेंबर २०१९ पासून २६३ कोटी रुपयांचे एकूण १२ बोगस टीडीएस् रिफंड केले आहेत. ते नंतर एस्बी एंटरप्रायझेसच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे वर्ष २००७-२००८ आणि २००८-२००९ या वर्षापासून प्रलंबित दर्शवलेल्या दाव्यांवर परतावा दिला गेला. त्यानंतर पाटील, त्यांचे सहकारी आणि जोडलेल्या अन्य आस्थापनांच्या इतर खात्यांमध्ये निधी वर्ग करण्यात आला.

संपादकीय भूमिका 

आयकर विभागात होणारा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !