विश्व हिंदु परिषदेकडून पोलीस, प्रशासन, चित्रपटगृह चालक आणि मालक यांना निवेदन
सोलापूर, २६ जानेवारी (वार्ता.) – देशविरोधी अभिनेते शाहरूख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्यांचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, तसेच सर्वश्री प्रमोद येलगेटी, नागेश बंडी, शीतल परदेशी, राजू मनसावले, प्रशांत परदेशी, दीपक मुखता यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. शाहरूख खान यांचे वागणे देशविरोधी असल्याचे त्यांच्या अनेक कृतींतून लक्षात येते. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर शाहरूख खान यांनी भारताचा राष्ट्रध्वज उलटा फडकवला होता. यासह त्यांनी ‘भारतात असहिष्णुता वाढीस लागली आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन केली आहे. आतंकवादी हाफीज सईदने पाकिस्तानात येऊन रहाण्याचे विधान केल्यावर त्याला एका शब्दानेही विरोध केला नाही.
२. अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयात केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. या आंदोलनात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. याचाच अर्थ हे कलाकार पडद्यावर देशप्रेमाची भूमिका बजावतात; मात्र त्यांची प्रत्यक्ष भूमिका देशविरोधी असते.
३. ‘पठाण’ चित्रपटातील काही दृश्ये हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारी आहेत. हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन चित्रपटगृहाच्या खासगी मालमत्तेची हानी झाल्यास या घटनेला चित्रपटगृह चालक आणि मालक उत्तरदायी असतील. यापुढे देशविरोधी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न करता जाज्वल्य देशाभिमान जागृत करणारे चित्रपट प्रदर्शित करावेत.