शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्‍या मध्‍यवर्ती सभागृहात स्‍थापन !

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २३ जानेवारी (वार्ता.) – हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंतीच्‍या दिवशी विधीमंडळाच्‍या मध्‍यवर्ती सभागृहात २३ जानेवारी या दिवशी त्‍यांच्‍या तैलचित्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते अनावरण करण्‍यात आले. गळ्‍यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.

राजकारण, चित्रपटसृष्‍टी, साहित्‍य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांतील मान्‍यवर या कार्यक्रमाला उपस्‍थित होते. विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍या उपस्‍थितीत हा कार्यक्रम पार पडला. राष्‍ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जीवनावर आधारित ‘झंझावात’ या लघुपटाचे प्रक्षेपण करण्‍यात आले. या वेळी व्‍यासपिठावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर उपस्‍थित होते. अभिनेते श्री. प्रसाद ओक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, स्‍वातंत्र्यवीर सावरकर, माजी मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण, एस्.एम्. जोशी या मान्‍यवरांची तैलचित्रे सभागृहात आहेत.