नाशिक – अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदु धर्मगुरूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रातून लवकरात लवकर रहित करावा. समाजातील मौलाना, पाद्री आणि भंते (भिक्खू) यांच्याकडून चमत्कार सिद्ध करावयाचे दावे केले जातात. ते दावे त्यांनी सिद्ध करून दाखवले, तर आम्ही ५१ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करतो, असे आव्हान महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत केवळ हिंदु धर्मगुरूंना लक्ष्य केले जात असून हा कायदा महाराष्ट्रातून रहित करावा, या मागणीसाठी २३ जानेवारी या दिवशी येथील रामकुंडावर येथील साधू-महंतांनी आंदोलन केले. या आंदोलनात १० आखाड्यांचे साधू-महंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांच्या भूमिकेचा निषेधही करण्यात आला. ‘धर्म की जय हो अधर्म का नाश हो’, अशा घोषणा साधू-संतांनी दिल्या.
येथील महंत अनिकेतशास्त्री जोशी यांनी आवाहन करत नाशिकमधील सर्व साधू-महंतांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात संघटित केले आहे. त्यानुसार येथील रामकुंड परिसरात साधू महंत यांची बैठक होणार असून यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रहित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व आखाड्यांचे साधू संत, संन्यासी, पुरोहित संघ, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना उपस्थित राहून जादूटोणाविरोधी कायद्याला विरोध दर्शवणार आहेत.
अंनिसद्वारे केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य केले जाते ! – महंत अनिकेतशास्त्री महाराजमहंत अनिकेत शास्त्री म्हणाले, ‘‘बागेश्वर बाबा यांनी माझ्याकडे अद़्भुत शक्ती आहे, असा कधीही आणि कुठेही दावा केलेला नाही. महाराजांकडे गेल्यामुळे भक्तांचे कल्याण झाल्याच्या कारणावरून अंधश्रद्धा निर्मूलन समिती दावा ठोकत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. बागेश्वर धामचे कार्य पुष्कळ चांगले आहे; परंतु ते (धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज) जर असा दावा करत असतील की, माझ्याकडे अद़्भुत शक्ती आहे, तर तेही निंदनीय आहे आणि त्याचे समर्थन कधीही सनातन धर्माने केलेले नाही. साधूसंतांनी कायम समाजसुधारणाच केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले जाते. त्यांच्याकडून इतर धर्मियांतील अंधश्रद्धांचे निर्मूलन केलेले कधीही पहायला मिळत नाही. केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणे हा अंनिसचा उद्देश आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रातून लवकर रहित व्हावा.’’ |