सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील अतूट श्रद्धेच्‍या बळावर अपघातासारख्‍या कठीण प्रसंगाला स्‍थिरतेने तोंड देणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) !

‘जून २०२२ मध्‍ये एका अपघातात माझ्‍या डाव्‍या हाताचा पंजा पूर्णतः कापला गेला. या अपघाताच्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती आणि त्‍या स्‍थितीत माझ्‍याकडून झालेले साधनेचेे प्रयत्न पुढे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. सुवर्णा श्रीराम

१. अपघाताच्‍या वेळी आणि नंतर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे अस्‍तित्‍व जाणवणे

अ. माझा अपघात झाल्‍यावर मी ‘परम पूज्‍य, परम पूज्‍य’, असे मोठ्याने म्‍हणत होते. तेव्‍हा माझ्‍या डोळ्‍यांमधून अश्रू येत नव्‍हते; कारण माझे गुरु (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) दुःख आणि वेदना सहन करण्‍यासाठी मला पुष्‍कळ बळ देत होते.

आ. अपघातानंतर मला चारचाकी गाडीने रुग्‍णालयात नेण्‍यात आले. त्‍या वेळी ‘माझ्‍या समवेत परात्‍पर गुरु डॉक्‍टर आहेत’, असे मला वाटत होते.

इ. रुग्‍णालयात जातांना पाऊस पडत होता. त्‍यामुळे मी थोडी भिजले होते. त्‍या वेळी ‘जणू गुरुदेवांच्‍या चरणांचे पाणी माझ्‍यावर पडत आहे’, असे मला वाटत होते.

२. रुग्‍णालयात अनुभवलेली गुरुकृपा

२ अ. ‘साधकांच्‍या रूपातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर जवळ आहेत’, असे वाटणे : रुग्‍णालयात गेल्‍यावर लगेचच माझ्‍यावर उपचार चालू झाले. तेव्‍हा ‘साधक माझ्‍यासाठी किती करतात’, हे पाहून माझ्‍याकडून पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती. ‘साधकांच्‍या माध्‍यमातून गुरुदेवच माझी काळजी घेत आहेत’, असे मला वाटत होते. आधुनिक वैद्य तपासणी करत असतांना मला पुष्‍कळ वेदना होत होत्‍या. त्‍या वेळी ‘तेथे असलेल्‍या साधकांच्‍या माध्‍यमातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍याजवळ आहेत’, असे मला जाणवले.

२ आ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍याशी भ्रमणभाषवर बोलणे झाल्‍यावर मानसिक आणि आध्‍यात्मिक आधार मिळणे : माझ्‍या हाताचे शस्‍त्रकर्म करायचे होते. त्‍या वेळी माझ्‍या समवेत सौ. सायली करंदीकर (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची कन्‍या) होती. तिने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंना अपघाताविषयी सांगितले. तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘सुवर्णा, आम्‍ही सर्व जण तुझ्‍या समवेत आहोत.’’ हे ऐकून मला मानसिक आणि आध्‍यात्‍मिक आधार मिळाला.

२ इ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘मी मनाने तुझ्‍याजवळच आहे’, असे सांगून धीर देणेे : शस्‍त्रकर्म झाल्‍यानंतर थोड्या वेळाने मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘सुवर्णा, कशी आहेस ? काळजी करू नकोस. परात्‍पर गुरुदेवांचा हात सतत तुझ्‍या डोक्‍यावर आहे. मी येथे रामनाथी आश्रमात आहे; पण माझे मन तुझ्‍याजवळ आहे. तू लवकर बरी होशील. आम्‍ही सर्वजण तुझ्‍यासाठी देवाला प्रार्थना करत आहोत.’’

२ ई. पाय पुष्‍कळ दुखत असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा धावा करणे आणि ‘प.पू. डॉक्‍टर’, प.पू. डॉक्‍टर’, असे म्‍हणत पायावरून हात फिरवल्‍यानंतर तो दुखायचा थांबणे : एकदा रात्री ८ – ८.३० वाजता शस्‍त्रकर्म झालेला माझा पाय पुष्‍कळ दुखत होता. (माझ्‍या मांडीची त्‍वचा काढून ती हातावर लावली आहे.) मला प्रचंड वेदना होत होत्‍या. त्‍या वेळी मी आणि माझा मोठा भाऊ श्री. आकाश श्रीराम परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा पुष्‍कळ धावा करत ‘प.पू. डॉक्‍टर, प.पू. डॉक्‍टर’, असे म्‍हणत होतो. ‘प.पू. डॉक्‍टर’, असे म्‍हणत मी माझ्‍या दुखर्‍या पायावरून हात फिरवला आणि लगेचच माझा पाय दुखायचा थांबला. केवढी ही गुरूंची कृपा आहे ! रुग्‍णालयात आम्‍ही ही गुरुकृपा अखंड अनुभवत होतो. ‘गुरुदेवांचा हात सतत माझ्‍या डोक्‍यावर आहे. गुरुदेव मला शक्‍ती आणि चैतन्‍य देत आहेत’, असे मला जाणवत होते.

२ उ. ‘ड्रेसिंग’ करतांना पुष्‍कळ दुखल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांचा धावा करणे, त्‍याच वेळी सद़्‍गुरु स्‍वातीताईंचा भ्रमणभाष येणे अन् धावा केल्‍यावर ‘ते तिघेही चैतन्‍य अन् बळ पुरवतात’, याची जाणीव होणे : एकदा सकाळी १० वाजता माझ्‍या हाताची मलमपट्टी (‘ड्रेसिंग’) करण्‍यासाठी आधुनिक वैद्य आले होते. ‘ड्रेसिंग’ करतांना माझा हात पुष्‍कळ दुखत होता. त्‍या वेळी मी मनातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा धावा करत होते. ‘ड्रेसिंग’ झाल्‍यावर मला कु. वैभवी भोवर हिचा भ्रमणभाष आला. ती म्‍हणाली, ‘‘सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांना तुझ्‍याशी बोलायचे आहेे.’’ मी सद़्‍गुरु स्‍वातीताईंशी बोलू लागले आणि मला जाणवले की, ‘ड्रेसिंग’ करतांना मला होणार्‍या वेदना जणू सद़्‍गुरु स्‍वातीताईंना जाणवल्‍या आणि त्‍यांनी मला भ्रमणभाष केला.

त्‍या वेळी मला अशीही जाणीव झाली की, ज्‍या ज्‍या वेळी मी धावा करते, त्‍या त्‍या वेळी मला परात्‍पर गुरु डॉक्‍टर, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि सद़्‍गुरु स्‍वातीताई चैतन्‍य अन् बळ पुरवतात.

३. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने तीव्र प्रारब्‍ध सुकर होणे

अ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझी किती काळजी घेत आहेत’, असे मला वाटत होते. माझ्‍यासाठी सद़्‍गुरु गाडगीळकाका, संत आणि चांगली आध्‍यात्‍मिक पातळी असलेले काही साधक नामजपादी उपाय करत होते. त्‍यामुळे ‘माझ्‍या प्रारब्‍धाची तीव्रता न्‍यून होऊन जे थोडेसे प्रारब्‍ध भोगायचे राहिले होते, त्‍यासाठी गुरुदेव मला बळ देत होते, असे मला जाणवले.

आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांनी मला सांगितले, ‘‘तुझ्‍या एका हाताचे कार्य झाले आहे.’’ तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले की, ‘माझा एक हात गुरुचरणी समर्पित झाला आहे.’

इ. सद़्‍गुरु गाडगीळकाका आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांनी मला सांगितले, ‘तुझ्‍यावर पुष्‍कळ मोठे संकट येणार होते, जे तुझ्‍या जिवावर बेतणार होते; परंतु ते डाव्‍या हातावर निभावले.’’

४. प.पू. दास महाराज यांनी दिलेल्‍या विभूतीला सुगंध येणे, त्‍यामुळे शक्‍ती आणि चैतन्‍य मिळाल्‍याचे जाणवणे

प.पू. दास महाराजांनी माझ्‍यासाठी रुग्‍णालयात खाऊ, विभूती आणि मारुतिरायाचे लहान चित्र पाठवले होते. त्‍यांनी पाठवलेल्‍या विभूतीला पुष्‍कळ सुगंध येत होता. ‘त्‍या सुगंधामुळे मला पुष्‍कळ शक्‍ती आणि चैतन्‍य मिळत आहे’, असे जाणवलेे. इतर वेळी रुग्‍णालयातील वातावरणात पुष्‍कळ दाब जाणवतो; पण मला तिथे थोडाही दाब जाणवत नव्‍हता. त्‍यामुळे ‘मी रुग्‍णालयात आहे’, असे न वाटता मला ‘येथे आश्रमासारखे वातावरण आहे’, असे वाटत होते.

५. रुग्‍णालयात असतांना भावाच्‍या स्‍तरावर केलेले प्रयत्न 

अ. मला रुग्‍णालयात जेवण जात नव्‍हते. तेव्‍हा ‘साधकांच्‍या माध्‍यमातून गुरुदेवच मला भरवत आहेत’, असा मी भाव ठेवला.

आ. मला ‘सलाईन’ लावले होते. तेव्‍हा ‘सलाईन’ म्‍हणजे ‘गुरुदेवांच्‍या चरणांचे तीर्थ आहे’, असा भाव मी ठेवला होता.

६. अपघातानंतर भीती किंवा काळजी न वाटता चैतन्‍य आणि आनंद अनुभवायला मिळणे

मी रुग्‍णालयात ‘गुरुदेवांचे हात माझ्‍या डोक्‍यावर आहेत’, असे अखंड अनुभवत होते. ‘माझ्‍या डाव्‍या हाताला आता बोटे नाहीत’, याची मला भीती वाटत नव्‍हती किंवा भविष्‍याविषयी कोणतीही काळजी मला वाटत नव्‍हती. या अपघातामुळे चैतन्‍य आणि आनंद अनुभवायला मिळाला; म्‍हणून मला कृतज्ञता वाटत होती.

कृतज्ञता !

हे लिखाण करतांना मला सर्व प्रसंग पुन्‍हा आठवत होते. तेव्‍हा मला माझ्‍या जवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टर दिसत होते. ‘हे सर्व मी कसे सहन केले ?’ याचे मलाच आश्‍चर्य वाटत होते. मला झालेला हा अपघात एका स्‍वप्‍नासारखाच वाटत होता आणि सर्व घटना मी विसरूनही गेले होते.

गुरुमाऊलींच्‍या कृपेमुळेच मला साधनेची गोडी लागली. त्‍यांनीच मला साधनेचे प्रयत्न करण्‍यासाठी बळ आणि चैतन्‍य दिले अन् माझ्‍यात भाव निर्माण केला. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला अनेक संकटांतून वाचवले आणि पुन्‍हा नवीन जन्‍म दिला आहे. ‘गुरुदेवा, तुम्‍ही मला साधनेचे आणि प्रामुख्‍याने आत्‍मबळ वाढवणारे व्‍यष्‍टी साधनेचे महत्त्व लक्षात आणून दिलेत; म्‍हणूनच अशा कठीण प्रसंगात मी स्‍थिर राहू शकले. धन्‍य धन्‍य ती गुरुमाऊली आणि धन्‍य धन्‍य ते गुरुमाऊलींचे भाग्‍यवान साधक ! अशा कृपाळू आणि प्रीतीस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या कोमल चरणी कोटीशः प्रणाम आणि कृतज्ञता !’

– कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक