परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि सनातन संस्थेचे प्रत्येक संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अंतरंगी जोडलेले असल्याचे अनुभवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. भावसत्संगाला जाण्याचा निरोप कळल्यावर पू. वामन यांनी त्यांना भावसत्संगात ध्वनीवर्धकावर बोलायचे असल्याचे सांगणे

‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (परात्पर गुरुदेवांच्या) सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या दिवशी सत्संगाचा निरोप मिळाल्यानंतर मी पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना सांगितले, ‘‘आज आपल्याला सत्संगाला जायचे आहे.’’ माझे बोलून झाल्यावर पू. वामन मला म्हणाले, ‘‘आई, आज मी सत्संगात ध्वनीवर्धकावर (माईकवर) बोलणार आहे. काल चित्रीकरण करतांना मला काय जाणवले ? ते मला नारायणांना (पू. वामन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘नारायण’, असे म्हणतात) सांगायचे आहे.’’

पू. वामन राजंदेकर

आमच्यातील हा संवाद ऐकायला प्रत्यक्षात तिथे कुणीच नव्हते. आमची सत्संगाला पोचण्याची गडबड चालू असल्याने मी हे पू. वामन यांचे बाबा (श्री. अनिरुद्ध राजंदेकर) किंवा बहीण (कु. श्रिया राजंदेकर) यांना सांगायला विसरून गेले.

२. पू. वामन यांनी त्यांच्या आईला सांगितलेले उद्गार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भावसत्संगामध्ये सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वज्ञतेची प्रचीती येणे

सौ. मानसी राजंदेकर

भावसत्संगाला आरंभ झाल्यावर काही वेळाने परात्पर गुरुदेव पू. वामन यांना उद्देशून म्हणाले, ‘‘अरे, आज तू सत्संगात बोलणार होतास ना ? तू म्हणालास ना, ‘आज मी ध्वनीवर्धकावर (माईकवर) बोलणार आहे.’’ त्या क्षणी त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले; कारण पू. वामन यांचे उद्गार अगदी तसेच होते.

पू. वामन आणि माझ्यातील हे बोलणे केवळ मलाच ठाऊक होते. त्या क्षणी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या सर्वज्ञतेची जाणीव झाली आणि माझे पाणावलेले डोळे बघून त्यांना समजले होते की, ‘माझ्या मनात काय भाव निर्माण झाला आहे ?’ मी निःशब्द झाले होते. काही वेळासाठी ‘माझ्यासाठी काळ थांबला आहे’, असे मला जाणवले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक क्षणी समवेत असल्याचे जाणवणे

परात्पर गुरुदेवांच्या या वाक्याने मला स्थुलातून प्रत्यक्ष भगवंताने प्रचीती दिली होती की, ‘ते प्रत्येक क्षणी आमच्या समवेत आहेत. आमचा प्रत्येक शब्द ते ऐकत आहेत. त्यांना सर्व ठाऊक असते.’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या सर्वज्ञतेची सूक्ष्मातून क्षणोक्षणी येणारी अनुभूती आज त्यांनी स्थुलातूनसुद्धा आम्हाला दिली. ‘यासाठी त्यांच्या चरणी किती आणि कशी कृतज्ञता व्यक्त करावी !’, तेच मला कळत नाही. हा प्रसंग आठवला, तरी माझ्या मनाची स्थिती निःशब्द होते. ‘माझी काहीच पात्रता नसतांना देव किती भरभरून देत आहे !’, याची मला जाणीव होते.

४. सनातन संस्थेचे प्रत्येक संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अंतरंगी जोडलेले असल्याचे जाणवणे

यातून ‘संत कशा पद्धतीने परात्पर गुरुदेवांशी अंतरंगी जोडलेले असतात ?’, हे मला शिकायला मिळाले. ते बाह्यतः काही वेगळ्या कृती करत असले, तरी ते सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. त्याच समवेत ‘परात्पर गुरुदेवसुद्धा कसे संतांशी जोडलेले असतात ?’, हे माझ्या लक्षात आले. यातून संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा माझ्या मनावर बिंबवले गेले.

५. ‘संत कसे भगवंताला दिलेला शब्द पाळतात ?’, हे शिकायला मिळणे

त्या दिवशी भावसत्संगात पू. वामन यांनी ध्वनीवर्धकावर (माईकवर) त्यांना जाणवलेले सांगितले आणि गुर्वाज्ञापालन केले. जे त्यांनी ठरवले होते, ते त्यांनी व्यवस्थितपणे सांगितले. यातून ‘संत भगवंताला दिलेला शब्द पाळतात’, हे मला शिकायला मिळाले. नाहीतर इतर कोणतेही इतके लहान मूल असते, तर ‘मी आता बोलणार नाही’, असे म्हणाले असते किंवा त्याने दुसरेच काहीतरी सांगितले असते; परंतु पू. वामन यांनी मला जे घरी सांगितले होते, तेवढेच सत्संगात सांगितले.

पू. वामन यांच्यामुळे परात्पर गुरुदेवांच्या सर्वज्ञतेची प्रचीती मला स्थुलातून अनुभवता आली. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने प्रत्येक क्षणी ‘ईश्वराचे सगुण रूप म्हणजे संत’, हे वाक्य मला अनुभवता येत आहे.

‘हे गुरुदेव, मी तुमच्या चरणी प्रार्थना करते, ‘तुमच्या या सगुण रूपाची सेवा करण्यात मी कुठेही न्यून पडू नये. माझे काही चुकले, तर मला हात धरून शिकवा. मला क्षमा करा. ‘तुमच्या या बालरूपाची सेवा तुम्हीच माझ्याकडून करवून घेत आहात’, याची जाणीव मला होत आहे. नाहीतर माझ्यासारख्या सर्वसामान्य जिवाला हे शक्यच नाही. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन राजंदेकर यांची आई) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक