पोलिसांनी १० वर्षांपूर्वी नोंदवलेल्या खोट्या गुन्ह्यातील २६ आरोपी निर्दोष !


मुंबई – मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावाच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटवल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी मारहाणीचे गुन्हे नोंदवले होते. १० वर्षांनी न्यायालयाने यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

१. मराठी भाषिकांचे प्राबल्य असूनही सीमाभागातील अनेक गावे भाषावार प्रांतरचनेच्या वेळी कर्नाटकात गेली. गेली ५४ वर्षे सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत आहे. यांतील येळ्ळूर हे सीमाभागातील छोटे गाव आहे. मराठी असण्याचे प्रतीक म्हणून ‘येळ्ळूर, महाराष्ट्र राज्य’ असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता.

२. वर्ष २०१४ मध्ये पोलिसांनी हा फलक काढून टाकला होता. त्याचा निषेध करणार्‍यांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केली. वृद्ध, महिला आणि लहान मुलेही यातून सुटली नव्हती. जेवणाच्या ताटावरून उठवून लोकांना मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी ज्यांना मारहाण केली, उलट त्यांच्यावरच मारहाणीचे गुन्हे नोंद केले होते. (मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई कधी होणार ? – संपादक)

३. निकालाच्या वेळी सरकारी पक्षाने विविध साक्षी, तसेच कागदपत्रांची पडताळणी केली. साक्षीदारातील विसंगतीमुळे न्यायालयाने सर्व २६ जणांना निर्दोष ठरवले.

संपादकीय भूमिका

१० वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?