संसारातील कर्तव्‍ये आनंदाने पार पाडून गुरुसेवेत रममाण होणार्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !

‘वर्ष २०१२ पासून माझा सौ. मीनाक्षी धुमाळताईंशी सेवेच्‍या निमित्ताने संपर्क आला. त्‍यातून आमची अधिक जवळीक झाली. गुरुदेवांच्‍या कृपेने मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. मीनाक्षी धुमाळ

१. उत्तम स्‍मरणशक्‍ती

सौ. लता ढवळीकर

ताईंची स्‍मरणशक्‍ती चांगली आहे. तिचा त्‍या सेवेसाठी पुरेपूर लाभ करून घेतात. पुष्‍कळ वर्षांपूर्वी झालेल्‍या चुकाही त्‍यांच्‍या लक्षात असतात. ‘त्‍या चुका पुन्‍हा होऊ नयेत’, यासाठी त्‍या प्रयत्न करतात.

२. परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणे

गेल्‍या वर्षी कोरोना महामारीमुळे लागू करण्‍यात आलेल्‍या दळणवळण बंदीच्‍या काळात ताईंच्‍या सुनेची प्रसुती झाली. दळणवळण बंदीमुळे सुनेला माहेरी जाणे किंवा तिच्‍या आईला गोव्‍यात येणे शक्‍य नव्‍हते. तेव्‍हा ताईंनी गुरुदेवांवर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि ‘गुरुदेवांच्‍या कृपेनेच सर्व व्‍यवस्‍थित होणार आहे. तेच सर्व शिकवतील अन् करवूनही घेतील’, असा भाव ठेवून प्रसंग स्‍वीकारला. त्‍यांनी उत्‍साहाने सुनेचे बाळंतपण केले. बाळ रुग्‍णालयातून घरी आल्‍यावर त्‍यांनी बाळाची सेवा आणि घरातील कामे चांगल्‍या प्रकारे केली.

३. सेवेची तळमळ

३ अ. घरी सून बाळंतीण असतांनाही ताईंच्‍या सेवेत खंड पडला नाही.

३ आ. दिवसभराच्‍या सेवेचे व्‍यवस्‍थित नियोजन करणे आणि साधकांना सेवेत साहाय्‍य करणे : दिवसभर सेवा करून घरी जातांना ताई नेहमीच उत्‍साही असतात. त्‍या दिवसभराच्‍या सेवेचे व्‍यवस्‍थित नियोजन करतात. त्‍या ‘साधकांना सेवेविषयी सूत्रे सांगणे, साधकांच्‍या सेवेतील अडचणी सोडवणे’ इत्‍यादी सेवा करतात. त्‍या साधकांना त्‍यांच्‍याकडून झालेल्‍या चुका परखडपणे सांगतात आणि त्‍या सुधारण्‍यासाठी साहाय्‍यही करतात. दळणवळण बंदीपूर्वी त्‍या साधकांना प्रत्‍यक्ष भेटून त्‍यांच्‍या अडचणी सोडवत असत.

३ इ. दळणवळण बंदीच्‍या काळातही सेवा अखंडपणे चालू असणे : दळणवळण बंदीच्‍या काळातही त्‍यांची सेवा अखंडपणे चालू होती. त्‍यांनी या काळातही दिवसभराच्‍या सेवेचे नियोजन केले आणि घरी राहून पूर्णवेळ सेवा केली.

४. जाणवलेले पालट

पूर्वी ताईंच्‍या बोलण्‍यात नम्रता नव्‍हती. त्‍या त्‍वरित प्रतिक्रिया व्‍यक्‍त करायच्‍या. त्‍यांच्‍या बोलण्‍यात कर्तेपणा जाणवायचा. वर्ष २०१९ च्‍या अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या वेळी आम्‍ही दोघी (मी आणि ताई) एकत्रित सेवा करत होतो. एकदा आम्‍ही दोघी आणि एक साधिका साधनेविषयी बोलत होतो. त्‍या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना करून त्‍या दोघींना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही एवढी वर्षे पूर्णवेळ सेवा करत आहात. आता साधनेत लवकर पुढे गेले पाहिजे. तुम्‍ही दोघीही ‘आपण कुठे न्‍यून पडतो ?’, याचे चिंतन करून बघा आणि तसे प्रयत्न वाढवा. ‘पुढच्‍या अधिवेशनापर्यंत स्‍वतःत पालट घडवून आणायचाच’, असा निश्‍चय करा. पुढच्‍या अधिवेशनापर्यंत आम्‍हाला तुम्‍हा दोघींच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता समजली पाहिजे.’’ त्‍यावर त्‍या दोघी म्‍हणाल्‍या, ‘‘हो ताई. आम्‍ही प्रयत्न करतो. साधनेत पुढे गेलेच पाहिजे.’’ त्‍यानंतर मीनाक्षीताईंनी प्रयत्नपूर्वक स्‍वतःत पालट घडवून आणला.

अ. त्‍यांच्‍या बोलण्‍यात मृदूता आणि नम्रता आली.

आ. त्‍यांच्‍यातील प्रेमभाव वाढल्‍यामुळे त्‍यांची सेवा भावपूर्ण होऊ लागली अन् त्‍यांच्‍यातील कर्तेपणा न्‍यून झाला.’

– सौ. लता दीपक ढवळीकर (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ६३ वर्षे), फोंडा, गोवा. (२४.७.२०२१)