नवी मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – कोणत्याही भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून व्याकरण मनापासून शिकले, तर त्यामध्ये गोडी वाढते, असे मत भाषा अभ्यासक वैभव चाळके यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बहुतांश मुले इंग्रजी माध्यमांमध्ये शिकतात. त्यांना मराठी भाषाही शिकवली जाते; मात्र घरात त्यांच्याशी बोलतांना इंग्रजीमिश्रित मराठीत बोलले जाते. त्यामुळे ‘धड ना इंग्रजी, ना मराठी’ अशा संभ्रमात त्या मुलाचा भाषा विकास होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘मुलाच्या भाषिक जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने पालकांनी सजग रहावे’, असेही ते म्हणाले.
समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजात मराठी शुद्धलेखन महत्त्वाचे असून त्यादृष्टीने हा विशेष उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले.