श्रीमती शैलीता भोवर यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. शर्वाणी आगरवाडेकर आणि जावई श्री. शेखर आगरवाडेकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. शर्वाणी आगरवाडेकर (श्रीमती शैलीता भोवर यांची मुलगी), म्हापसा, गोवा.
१ अ. कष्टमय जीवन : ‘माझी आई श्रीमती शैलीता (नमिता) नामदेव भोवर हिचे पूर्वीचे जीवन पुष्कळ कष्टात गेले. आम्ही एकूण ३ भावंडे होतो. मोठा भाऊ श्री. केतन नामदेव भोवर (वय ४१ वर्षे, गोवा), मी सौ. शर्वाणी आगरवाडेकर, (मधली मुलगी, वय ३९ वर्षे, गोवा) आणि धाकटा भाऊ श्री. केदार नामदेव भोवर (वय ३५ वर्षे, गोवा) अशा आम्हा तिघांवर तिने चांगले संस्कार केले. आईने बालवाडीत शिक्षिकेची नोकरी करून आमचा उदरनिर्वाह केला. नोकरीसाठी दूरवर जावे लागून मानधनही अत्यल्प होते, तरीही तिने कुठलेही गार्हाणे न करता आम्हा मुलांना काही अल्प पडू दिले नाही.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून साधना आणि सेवा यांना आरंभ होणे : वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गोवा येथील साधकांसाठी मार्गदर्शन होते. तेव्हा आईने साधनेला नुकताच आरंभ केला होता. ती नोकरी करत असे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकल्यापासून तिने नियमित नामजपाला आरंभ केला. नामजप करतांना तिला सुगंधाची अनुभूती यायची. तिने धर्मसभा, गुरुपौर्णिमा प्रसार, पंचांग, ग्रंथ वितरण या सेवांत सहभाग घेतला आणि त्यांत तिला आनंदही मिळत गेला. तिची गुरुदेवांवरची श्रद्धा दृढ होत गेली. तिने साधना करायला आरंभ केल्यानंतर ‘पूर्वी कठीण प्रसंगात देवाने तिला कसे साहाय्य केले’, हे तिच्या लक्षात आले.
१ इ. इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करण्याच्या तळमळीमुळे समाजाकडून गौरव केला जाणे : समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन तिचा ३ वेळा सत्कार करून तिला गौरवण्यात आलेे. ती सेवानिवृत्त झाल्यावर गावातील लोकांनी तिचा सत्कार केला. तिने गावातील लोकांना अनेक वेळा आधार दिला आहे. कुणाला काही न्यून पडल्यास गावातील लोक तिच्याकडे साहाय्यासाठी यायचे आणि ती त्यांना साहाय्य करायची. ती गावातील कुणाला कधी जेवणासाठी तांदूळ द्यायची, कधी धनरूपाने साहाय्य करायची, तर कधी कुणा रुग्णाईताला रुग्णालयात न्यायचे असल्यास त्याच्या समवेत जायची. ती रुग्णांच्या समवेत राहून त्यांची सेवा करायची आणि त्यांना साहाय्य करून आधार द्यायची. त्यामुळे आजही अनेक लोक तिची आठवण काढतात. हे सर्व तिने निरपेक्षपणे केले. तिने कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवली नाही. ‘इतरांचे भले व्हावे’, यातच तिला समाधान वाटायचे.
१ ई. वडिलांच्या निधनानंंतर गुरुकृपेने आई स्थिर असणे : वर्ष २०१५ मध्ये माझ्या बाबांचे त्यांच्या वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने आई पुष्कळ स्थिर होती. गुरुदेवांची ही कृपा आम्हाला जवळून अनुभवता आली. आम्ही करत असलेल्या साधनेमुळेच आम्ही त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकलो.
१ उ. संतांविषयी असलेला भाव ! : माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी पू. सदाशिवभाऊ परब (सनातन संस्थेचे २६ वे संत (वय ८१ वर्षे)) तिला भेटायला आले होते. तेव्हा आईला ‘पू. भाऊंच्या रूपात गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) येऊन भेटून गेले’, असे वाटले.’
२. श्री. शेखर आगरवाडेकर (श्रीमती शैलीता भोवर यांचे जावई), म्हापसा, गोवा.
२ अ. ‘माझ्या सासूबाई श्रीमती शैलीता भोवर या सतत सकारात्मक आणि उत्साही असतात.
२ आ. निरीक्षणक्षमता : त्यांचे निरीक्षण चांगले आणि अचूक असते.
२ इ. व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी इतरांचे साहाय्य घेऊन स्वयंसूचना बनवून घेऊन त्या नियमितपणे देणे : त्यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतील स्वयंसूचना (स्वभावदोष न्यून होण्यासाठी द्यायच्या सूचना) सिद्ध करायला जमत नाहीत. तरीही ‘आपले स्वभावदोष जावेत’, अशी त्यांची तळमळ असते. त्या इतरांचे साहाय्य घेऊन स्वयंसूचना बनवून घेतात. इतरांना आपले स्वभावदोष विचारून ते पालटण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते.
२ ई. साधनेचे प्रयत्न मनापासून आणि भावाच्या स्तरावर करणे : त्यांच्यात साधनेची पुष्कळ तळमळ आहे. त्या या वयातही प्रसारातील सेवा करतात. त्या साधनेचे प्रयत्न मनापासून आणि भावाच्या स्तरावर करतात. ‘त्या दिवसभर गुरुदेवांना कशा प्रकारे अनुभवतात’, हे त्या उदाहरणासहित सांगतात. त्या घेतलेले ध्येय अल्प कालावधीत पूर्ण करतात. त्या ‘ऑनलाईन’ स्वरूपात होत असलेल्या सत्संगात त्यांनी केलेले साधेनेचे प्रयत्न आत्मनिवेदन स्वरूपात नियमितपणे सांगतात.
२ उ. त्या त्यांना होत असलेले सर्व त्रास आत्मनिवेदन स्वरूपात गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतात.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ९.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |