साधी राहणी, अनासक्‍त आणि मन लावून साधना करणार्‍या फोंडा (गोवा) सौ. सुनीती अनंत आठवले (वय ७८ वर्षे) !

॥ श्रीकृष्‍णाय नमः ॥

पौष कृष्‍ण त्रयोदशी (२०.१.२०२३) या दिवशी सौ. सुनीती आठवले यांचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त पू. अनंत आठवले यांनी (पू. भाऊकाकांनी) सौ. सुनीती यांची लिहिलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

सौ. सुनीती आठवले

सौ. सुनीती आठवले यांना ७८ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा नमस्‍कार !

पू. अनंत आठवले

१. पाककला आणि शिवणकला यांत निपुण असणे

‘सौ. सुनीती पाककला आणि शिवणकलेत सिद्धहस्‍त आहेत. त्‍यांनी ह्या विषयांचे प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा ह्या विषयांवर पुस्‍तकेसुद्धा वाचलेली नाहीत. खाण्‍याचे पदार्थ बनवताना त्‍यांनी कधी घटक मोजून किंवा तोलून घेतले नाहीत. केवळ अनुमानाने घेत असत. तरीही पदार्थ उत्तम बनत. आता वयोमानानुसार हात कापतात, त्‍यामुळे पदार्थ बनविणे किंवा शिवण करणे जमत नाही.

२. साधी राहणी आणि अनासक्‍त

सौ. सुनितींची राहणी अगदी साधी आहे. त्‍यांनी कधीही मेक-अप (make-up) केला नाही. भेट स्‍वरूप आलेल्‍या मेक-अप च्‍या वस्‍तूही त्‍यांनी इतरांना देऊन टाकल्‍या. त्‍यांनी साडी किंवा अलंकारांची मागणी आमच्‍या विवाहित जीवनात कधीही केली नाही. ‘आज हॉटेलात काही खायला जाऊया’ किंवा ‘आज बाहेर जेवायला जाऊया’ असे इतक्‍या वर्षांत त्‍या एकदा सुद्धा म्‍हणलेल्‍या नाहीत.

३. साधना

अ. सौ. सुनीती देवतांची स्‍तोत्रे म्‍हणणे, जप करणे इ. अगदी मन लावून करतात. त्‍या वेळी कोणी जवळ आले तरी त्‍यांना कळत नाही.

आ. त्‍यांनी शास्‍त्रोक्‍त ज्ञानामध्‍ये कधी रुची घेतली नाही पण न मला कधी जप करायला सांगितले न ग्रंथांच्‍या माझ्‍या दिवसभर चालणार्‍या अध्‍ययनाला कधी विरोध केला.

इ. जप करताना त्‍या कधीच जप माळ घेत नाहीत. एकदा मी विचारले की माळ न घेता जप करता, जप किती झाला हे कसे कळणार ? त्‍यावर त्‍या म्‍हणाल्‍या ‘जप करायचा ! तो मोजायचा कशाला ?’

ई. रात्री झोपण्‍याच्‍या आधी मी देव्‍हार्‍यातील देवांना नमस्‍कार करून शयन कक्षात जात असतो. पण सकाळी उठल्‍यावरसुद्धा आधी त्‍या देवांना नमस्‍कार करून मग रोजच्‍या कामांना लागायचे, हे मी सौ. सुनीतींचे पाहून शिकलो. त्‍या तसे करतात.’

॥ श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु ॥

– अनंत आठवले (पती, वय ८६ वर्षे), फोंडा, गोवा. (१०.४.२०२२)

अखंड नामजपाचा आनंद अनुभवणार्‍या सौ. सुनीती अनंत आठवले !

‘ वर्ष २००६ मध्‍ये आम्‍ही भोपाळ येथे असतांना मी संत तुलसीदास यांचे ‘रामचरितमानस’ वाचत होते. त्‍या वेळी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्‍ण हरे कृष्‍ण कृष्‍ण कृष्‍ण हरे हरे ।’ हा नामजप करणार्‍याला मोक्षप्राप्‍ती होते’, असे मला कळले . त्‍यामुळे मी हा नामजप चालू केला. गेल्‍या काही वर्षांपासून माझा हा नामजप अखंड चालू आहे. झोपेतून उठल्‍यावरही माझा तो नामजप चालू असल्‍याचे माझ्‍या लक्षात येते. इतर वेळीही मनाकडे लक्ष गेले, तर ‘नामजप आतून आपोआप चालू आहे’, हे लक्षात येते. ह्या नामजपामुळे मला ताण, काळजी असे कधी वाटत नाही. वयोमानानुसार शरीर थकलेले असले, तरी मनाला उत्‍साह असतो आणि माझे मन नेहमी आनंदी असते.

माझे आई-वडीलही कृष्‍णभक्‍त होते. त्‍यांच्‍याकडून मला साधनेचे संस्‍कार मिळाले. माझ्‍या आईला तिच्‍या शेवटच्‍या दिवसांमध्‍ये ‘श्रीकृष्‍ण तिला न्‍यायला आला आहे’, असे सूक्ष्मातून दिसायचे. या संदर्भात तिने इतरांनाही सांगितले; परंतु त्‍या वेळी तिच्‍या बोलण्‍याकडे कोणी लक्ष दिले नाही. तिच्‍या देहत्‍यागानंतर तिच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीची सर्वांना निश्‍चिती झाली. आई-वडिलांनी केलेल्‍या संस्‍कांरांमुळेच मी लहानपणी स्‍तोत्रपठण तसेच ‘श्रीकृष्‍णाय नम: ।’ हा नामजप करीत असेे. लग्‍न झाल्‍यानंतर मुलांचे शिक्षण-संगोपन करण्‍यामध्‍ये साधनेचा भाग काही झाला नाही.  वर्ष २००६ मध्‍ये आम्‍ही भोपाळला असतांना माझ्‍या ह्या नामसाधनेला आरंभ झाला आणि आता नामजप करावा लागत नाही, तर आपोआप (अजपाजप) होतो. ’

सौ. सुनीती अनंत आठवले (ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांच्‍या पत्नी अन् परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या वहिनी), फोंडा, गोवा.