नवी मुंबई, १८ जानेवारी (वार्ता.) – ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’निमित्त कोकण भवन येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद़्घाटन भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोकण विभागाचे भाषा संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय आणि बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटना, कोकण भवन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबण्यात येत आहे.
या वेळी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, मुंबई आणि कोकण विभागीय साहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्ये, कोकण विभागाच्या साहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, तहसीलदार प्रितीलता कौरथी माने, तसेच कोकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राज्यभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर अधिकाधिक होण्यासाठी, तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यात १४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, माहितीपट, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे राज्यातील विविध महाविद्यालये, सामाजिक संस्था यांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.