कोरोनापेक्षा रस्‍ते अपघातात मृत्‍यू झालेल्‍यांची संख्‍या अधिक ! – राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्‍त

नवी मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – कोरोनापेक्षा रस्‍ते अपघातात मृत्‍यू पावलेल्‍यांची संख्‍या अधिक असून याला आळा घालण्‍यासाठी सर्वांनी वाहतुकीच्‍या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी वाशी येथे केले. नवी मुंबई पोलीस आयुक्‍तालयाच्‍या वाहतूक विभागाच्‍या वतीने आयोजित ‘रस्‍ता सुरक्षा सप्‍ताह -२०२३’च्‍या सांगता समारंभात ते बोलत होते. या वेळी पोलीस आयुक्‍त मिलिंद भारंबे, अभिनेता स्‍वप्‍नील जोशी आदी मान्‍यवर व्‍यासपिठावर उपस्‍थित होते.

नार्वेकर पुढे म्‍हणाले की, वाहतूक नियमांच्‍या पालनाविषयी आता मुलांनी पुढाकार घेऊन पालकांना नियमांचे पालन करण्‍यासाठी आग्रह करणे आवश्‍यक आहे. सध्‍या दुचाकीच्‍या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. गाडी चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, आसनासाठीचा पट्टा न लावणे यांमुळे होणारे अपघात टाळता येणारे आहेत. घरातील तरुण किंवा कर्त्‍या व्‍यक्‍तीचा अपघाती मृत्‍यू झाला, तर कुटुंबासाठी तो मोठा आघात असतो. यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे. सीसीटीव्‍ही, पार्किंग यांचा वापर, पायाभूत सुविधांची कामे चालू असलेल्‍या ठिकाणी वाहतुकीला अडथळा न होणे याविषयी वाहतूक पोलीस विभाग आणि महापालिका संयुक्‍त बैठक घेणार आहेत.

‘रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहा’साठी २ सहस्र हेल्‍मेट देणार्‍या ‘रिलायन्‍स जिओ फाउंडेशन’चे प्रतिनिधी, तसेच अन्‍य प्रायोजकांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

अभिनेते स्‍वप्‍नील जोशी म्‍हणाले, ‘‘आपले आयुष्‍य सुरक्षित रहाण्‍यासाठी पोलीस त्‍यांचे कौशल्‍य पणाला लावतात. त्‍यामुळे ते आपल्‍यासाठी खरे अभिनेते (हिरो) आहेत. प्रवासात वाहतूक पोलीस दिसल्‍यास थांबून त्‍यांना ‘धन्‍यवाद’ बोला, यातून त्‍यांना प्रोत्‍साहन मिळेल.’’